छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतजमीन पाण्याखाली गेला असून ओढे-नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं लोक अडकल्याचं समोर येत आहे.
लातूर, परभणी, जालन्यात शेतकरी हवालदिल :
परभणी, लातूर आणि जालन्यात शेतकऱ्यांचं संकट मोठं आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळं पारंपरिक व नगदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूरमध्ये मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळं रस्त्यांवर पाणी साचलं असून भेटा-आंदोरा गावाचा संपर्क तुटला आहे. जालन्यात नद्या-नाले ओसंडून वाहत असल्यानं शेती पाण्याखाली गेली आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
माजलगाव धरण ओव्हरफ्लो- शिरूर गाव पाण्यात :
बीड जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला असून शिरुर कासारमध्ये मुसळधार पावसामुळं सिंदफणा नदीला पूर आला आहे. नदीचं पाणी बाजारपेठा आणि घरांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. माजलगाव धरणातील 11 दरवाजे उघडून सिंदफणा नदीत 62,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विसर्ग प्रमाण परिस्थितीनुसार बदलता येईल.
धारशिवच्या चांदणी नदीला पूर :
धाराशिव जिल्ह्यातील भूम व परांडा तालुक्यात पावसामुळं चांदणी नदीला पूर आला, ज्यामुळं जवळपास 200 ते 300 लोक अडकले आहेत. परंडा तालुक्यातील 48 लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. शिरापूर गावात 6 लोक अडकले असून स्थानिक नागरिक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
जायकवाडीची पाणीपातळीत वाढ, पैठणच्या ५० घरांत पाणी :
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मागणी नदीला पूर आला असून नालवाडी शिवारातील साठवण तलाव भरुन वाहत आहे. किंबहूना रेनापुरी, दयाळा, भांबेरी या गावांचा संपर्क तुटला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून जायकवाडी व राहुलनगर येथील 50 घरांमध्ये पाण्याचा थैमान आहे. मागील आठ दिवसांपासून सतत पावसामुळं परिस्थिती गंभीर आहे.