गेल्या काही दिवसापासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथे अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली असून 38 गावांना पूर्वपरिस्थितीने वेढले आहे. या ठिकाणी अडकलेल्या 3603 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यासह पूरस्थिती पाहता आज 24 सप्टेंबरलाही सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
सोलापूर येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील माढा, मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच सोलापूर – पुणे महामार्गावर सीना नदीवरील लांबोटी येथील जुन्या पुलावर पाणी आल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला असून विजयपूर–सोलापूर महामार्गावरील हत्तूर पुलावरही पाणी आल्याने तो बंद करावा लागला आहे. म्हणून काल रात्री 8 वाजल्यापासून जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यासह रेल्वे प्रशासनाने सीना नदीवरील पुलावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग ३० किमी प्रती तास इतका कमी केला आहे. यासह या जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
हवाईदलाच्या मदतीने बचावकार्य सुरु
सोमवारी रात्री सोलापूर जिल्ह्यात 20 मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या जिल्ह्यातील माढा तालुक्यात सर्वाधिक बाधित आढळून आले असून सैन्य, एनडीआरएफ आणि हवाईदलाच्या मदतीने बचावकार्य सुरु असून वकव आणि उंदरगाव येथे चार बोटींच्या साहाय्याने बचावकार्य सुरु आहे. तर हेलिकॉप्टरद्वारे 10 जणांना वाचवण्यात आले आहे.
या भागातील शाळा प्रशासनाने बंद
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा व करमाळा तालुक्यांतील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूरग्रस्त भागाची पाहणी करत ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सोलापूर येथील हिप्परगा, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, मंद्रूप या भागातील शाळा प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
3 दिवसांत 3 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 3 दिवसांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये माढा, बार्शी, मंगळवेढा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर लांबोटी, तिन्हे, हत्तूर येथे महामार्ग बंद 38 गावे पाण्याखाली गेले असून याठिकाणी 3603 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.