नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर कर्नल पदावर बढती मिळाली आहे. 2008 झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 15 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर निर्दोष सुटलेल्या पुरोहित यांचा हा प्रवास आता एका नव्या टप्प्यात पोहोचला आहे. न्यायालयीन निर्णयानंतर सैन्यानं दिलेली ही पदोन्नती त्यांच्यासाठी केवळ व्यावसायिक मानचिन्ह नाही, तर न्यायव्यवस्थेवर ठेवलेल्या विश्वासाचा परिपाक मानला जात आहे.
न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल :
31 जुलै रोजी विशेष एनआयए न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली. न्यायालयानं निकालात स्पष्ट केलं की केवळ संशयावरुन कोणालाही दोषी ठरवता येत नाही. ठोस आणि खात्रीशीर पुरावे नसताना शिक्षा देता येणार नाही, असं निरीक्षण या निकालातून नोंदवलं गेलं होतं.
मालेगाव स्फोटाची पार्श्वभूमी :
29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं मशिदीजवळ स्फोट झाला. या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जखमी झाले. या घटनेनंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञा ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती.
राजकीय हेतूंचे आरोप :
निर्दोष सुटल्यानंतर पुरोहित यांनी आरोप केला की या प्रकरणामागे राजकीय हेतू दडलेले होते. तपासादरम्यान त्यांच्यावर काही उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची नावं या खटल्यात ओढण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या कायदेशीर पथकानं साक्षीदारांच्या जबाबांतील विरोधाभास आणि तपासातील त्रुटी न्यायालयासमोर अधोरेखित केल्या होत्या.
राजकीय प्रतिक्रिया काय :
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुरोहित यांचं अभिनंदन केलं. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “कर्नल पुरोहित यांना गणवेशात परतल्याबद्दल शुभेच्छा. सरकार देशभक्त अधिकाऱ्यांसोबत ठामपणे उभं आहे.” पुरोहित यांची बढती ही केवळ वैयक्तिक विजय नसून, दीर्घ कायदेशीर संघर्षानंतर न्याय मिळाल्याचं प्रतीक ठरली आहे. सैन्यात पुनरागमन करताना त्यांचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.