राज्यात आज विजयादशमीचा जल्लोष असून यंदा एकाच दिवशी तब्बल पाच दसरा मेळावे रंगणार आहेत. परंपरेप्रमाणे शिवसेनेच्या दोन्ही गटांसह पंकजा मुंडे, मनोज जरांगे, आरएसएस आणि बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे आयोजित करत आहेत. या सर्व मेळाव्यांचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मोठे औत्सुक्य आहे.
आरएसएसचा शताब्दी मेळावा :
आज आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शताब्दी मध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा ऐतिहासिक विजयादशमी मिळावा नागपुरात रेशीमबाग मैदानावर झाला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते.
ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर :
ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हा मेळावा शिवसेनेच्या राजकीय शक्तीचे दर्शन घडवत आला आहे. यंदा उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांवर भाष्य करून मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढल्याने संभाव्य युतीबाबतही चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटाचा मेळावा गोरेगावात :
दुसरीकडे, शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे होणार आहे. पूर्वनियोजित आझाद मैदान पावसामुळे चिखलमय झाल्याने ठिकाण बदलण्यात आले. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांना संबोधित करतील. “शेतकऱ्यांच्या बांधावर दसरा” या संदेशासह त्यांनी मेळाव्याचा सूर आधीच स्पष्ट केला आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडेचा उत्सव :
बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पारंपरिक उत्साहात पार पडणार आहे. सावरगाव घाटावर भगवान बाबांच्या मंदिरात पूजा-अर्चा केल्यानंतर त्या दुपारी भाषण करतील. मुंडे समर्थक मोठ्या संख्येने येथे दाखल होण्याची अपेक्षा आहे. या मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेही उपस्थित राहणार आहेत.
मनोज जरांगेंचा नारायण गडावर मेळावा :
दरम्यान, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे आज नारायण गडावर मेळाव्यात सहभागी होतील. तब्येतीमुळे ते ॲम्बुलन्सने पोहोचणार असून गडावर दर्शन घेतल्यानंतर समाजबांधवांशी संवाद साधतील.
पोहरादेवीवर बंजारा समाजाची ताकद :
तर पोहरादेवी येथे बंजारा समाजाचा दसरा मेळावा दुपारी दोन वाजता होईल. समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे यासाठी पुढील रणनीती याच मेळाव्यात जाहीर केली जाईल.
राजकीय वातावरण तापणार :
एकाच दिवशी पाच महत्त्वाचे मेळावे होत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.