मुंबई : केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत मोठा बदल दिसत आहे. खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत नागरिकांनी उत्साहात वाहन खरेदीसाठी गर्दी केली होती. मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) गुरुवारी संध्याकाळपर्यंत 18,471 वाहनांची नोंदणी झाली. शुभदिन म्हणून मानल्या जाणाऱ्या या दिवशी विक्रीत झालेली ही वाढ लक्षणीय ठरली आहे. सकाळपासूनच विविध वाहन वितरकांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. नवीन गाड्या घेऊन नागरिकांनी मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला. अनेक शोरूमनी यासाठी विशेष काऊंटर, अतिरिक्त कर्मचारी आणि संगणकीय नोंदणी व्यवस्था केली होती. वाहन वितरकाच्या पातळीवरच नोंदणी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची सोय झाल्याने अर्जदारांना अडचण आली नाही.
दिवाळी हा हंगाम ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी पर्वणी :
काही शोरूमसमोर सजवलेल्या नव्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. ग्राहकांनी कुटुंबासोबत गाडी खरेदी करून त्याची देवळात नेऊन पूजा केली. विशेष क्रमांक आरक्षित करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर अर्ज आले. त्यामुळे अनेकांनी 1 ते 2 आठवडे आधीच वाहन बुक करून आज डिलिव्हरी घेतली. गेल्या काही महिन्यांत बाजारात मंदीचे वातावरण असतानाही नवरात्री, दसरा, दिवाळी हा हंगाम ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी पर्वणी ठरतो. विक्रेते आणि आरटीओ प्रशासन यांच्या मते, सणासुदीच्या काळात आणखी विक्री वाढण्याची चिन्हे आहेत. दिवाळीपर्यंत विक्रीचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर काळात मुंबई आरटीओमध्ये झालेल्या वाहनांची नोंदणी :
22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर काळात मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये 16,123 मोटर सायकल/स्कूटर यांची नोंदणी झालेली असून, 2348 चारचाकी वाहनांची नोंदणी झालीय.