मुंबई : सध्या इंटनेटचा प्रसार इतका वाढला आहे, कि जवळपास सगळीच काम इंटरनेटशिवाय पूर्ण होताच नाहीत. इंटरनेटने माणसाला पूर्णपणे व्यापले आहे. जितका इंटरनेटचा वापर वाढला आहे, तितकाच त्याचे दुष्परिणाम देखील समोर येत आहेत. इंटरनेटचा उपयोग अनेक चांगल्या वाईट कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. इंटरनेटच्या वापराने अनेक कामं ही सोपी झाली आहेत. इंटरनेटचा वापर चांगल्या कामासोबतच गुन्हेगारीच्या कामासाठी देखील वापरण्याच्या प्रमाणात देखील सातत्यानं वाढ होत चालली आहे. ऑनलाईन पैशांची फसवणूक, ‘डिजिटल अरेस्ट’ या सारख्या गुन्ह्यांच्या घटना सातत्याने उघड होत आहेत. डायरेक्ट बँक अकाउंटवर हल्ला करण्याबरोबरच AI च्या वापराने अल्पवयीन मुलांनाही इंटनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्य केले जाते. अनेक सेलिब्रेटीसुद्धा सायबर गुन्ह्यांचे बळी ठरल्याचं अनेकदा समोर आले आहे. दरम्यान, आता, सायबर गुन्ह्याबाबत मोठा खुलासा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. याविषयी बोलताना अक्षयने त्याच्या 13 वर्षांच्या मुलीसोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
ऑनलाइन गेममध्ये “न्यूड फोटो“ची मागणी
शुक्रवार (3 ऑक्टोबर 2025) रोजी सायबर जागृती महिना 2025 च्या उद्घाटन समारंभात बोलताना अक्षय कुमारने त्याच्या 13 वर्षांच्या मुलीसोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग उघड केला. यावेळी अक्षयने सांगितले, की एका ऑनलाइन व्हिडिओ गेममध्ये अक्षयच्या मुलीकडे ‘नग्न छायाचित्रे’ मागण्यात आली होती.
मुंबईतील राज्य पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सायबर जागृती महिना 2025 साठी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सायबर गुन्ह्याविषयी बोलताना अक्षय कुमारने उपस्थित मान्यवरांना त्याला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. अक्षयने सांगितले की, “माझ्या घरात घडलेली एक छोटी घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही महिन्यांपूर्वी त्याची 13 वर्षांची मुलगी एक ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत होती. या गेममध्ये अनोळखी व्यक्तीसोबत देखील खेळता येते. तुम्ही गेम खेळत असताना कधीकधी तिकडून मेसेज येतो. असाच एक मेसेज आला, ‘तू मुलगा आहेस की मुलगी?’ तर तिने उत्तर दिले, ‘मुलगी.’ आणि लगेच त्याने दुसरा मेसेज पाठवला, ‘तू मला तुझी न्यूड फोटो पाठवू शकतेस का?’ तिने लगेच तो गेम बंद केला, आणि माझ्या पत्नीला याबद्दल सांगितले यामुळे मोठा अनर्थ टळला. अशा प्रकारे या गोष्टींची सुरुवात होते. हा देखील सायबर गुन्ह्याचा एक भाग” असल्याचं अक्षय कुमारने सांगितले.
शालेय शिक्षणात ‘सायबर पिरियड‘ चालू करण्याची विनंती
अक्षय कुमारने त्याच्या मुलीचा अनुभव सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण विनंती करत, सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आठवड्याला ‘सायबर पीरियड’ नावाची एक तासिका असावी. आणि या तासिकेमध्ये मुलांना सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती आणि शिक्षण दिले जावे, अशी मागणी केली.
यापुढे बोलताना त्याने म्हंटले,”तुम्हा सर्वांना माहीत आहे की हा गुन्हा स्ट्रीट क्राईमपेक्षा मोठा होत चालला असून त्याला थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.” त्यामुळे डिजिटल युगात मुलांना सुरक्षित आणि माहितीपूर्ण ठेवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात सायबर शिक्षणाचा समावेश करण्याची विनंती अक्षयने सरकारकडे केली. या कार्यक्रमासाठी अभिनेता अक्षय कुमारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, IPS इकबाल सिंह चहल आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.