मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद सुरु होता. आता हा वाद मिटला असून महाराष्ट्राला नवीन ओळख देणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिनकर बाळू पाटील म्हणजेच दि. बा. पाटील असे नाव देण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि बा पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील सहमती मिळाली होती.
याच महिन्यात या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांसाठी संघर्ष केलेले लोकनेते दि बा पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
कोण होते दि. बा. पाटील ?
दि. बा. पाटील हे रायगड जिल्ह्यातील होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील जासई मध्ये 13 जानेवारी 1926 साली झाला. त्यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील होते. त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. त्यांनी पुण्यातून वकिलीचे शिक्षण घेऊन सामाजिक कार्यात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून म्हणजेच शेकाप मधून राजकीय कारकिर्द सुरु केली. पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. यासह त्यांनी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले. त्यांनी 1999 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता, परंतु वृद्धापकाळामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते.
नवी मुंबई येथे उदघाटन करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ असेल. नवीन विमानतळाचे नाव दि.बा. पाटील द्यावे या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते. यामध्ये खासकरून आग्री कोळी समाजाचा समावेश होता. याबाबत सरकारला त्यांनी निवेदन देखील दिले होते. जर विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळ चालू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला होता. तसेच दि. बा. पाटील नामकरणाचा विषय काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत देखील मांडण्यात आला होता. आणि आज दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.