पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने आणि महापालिकेचे श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ऑक्टोबर २०२५ रोजी “अभिजात मराठी भाषा दिवस” तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
यानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय साहित्यिक चर्चा, गझल, अभंग, भजन, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शने, मराठी चित्रपट कलाकारांशी हितगुज, पोवाडे, बालनाट्य एकांकिका, मराठी वेशभूषा, लोककला कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.
अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश मराठी भाषेची अभिजात परंपरा, तिचे समृद्ध साहित्य व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोककला, नाट्यप्रयोग, अभिवाचन, गझल गायन, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेची सखोल ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना या कार्यक्रमांत सहभागी होता येईल, यादृष्टीने सप्ताहातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली.
या उपक्रमात मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, प्रख्यात साहित्यिक, कवी, गायक, व्याख्याते व संशोधक यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे नागरिकांना मराठी भाषेच्या विविध अंगांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच या निमित्ताने मराठी साहित्य व संस्कृतीचा अभिमान वृद्धिंगत होईल, असा विश्वास महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी व्यक्त केला.
येथे होणार कार्यक्रम
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर अशा विविध ठिकाणी होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.