कोलंबो : महिला विश्वचषक 2025 चा भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील सामना कोलंबोच्या मैदानावर खेळवला जात आहे. यात पाकिस्तानी कर्णधार फातिमा साना हिनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही तसंच कोणत्याही प्रकारचा संवादही केला नाही. तिनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुरुष संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव प्रमाणेच कृती केली.
हरमनप्रीत कौर काय म्हणाली
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. रेणुका सिंग ठाकूरनं अमनजोत कौरची जागा घेतली आहे. नाणेफेकीच्या वेळी हरमनप्रीत कौर म्हणाली, “विश्वचषकापूर्वी आमची इथं चांगली मालिका होती. आम्ही सकारात्मक विचार करत आहोत आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एक संघ म्हणून चांगले खेळलो आहोत आणि आजच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.”
सूर्यानं केलं नव्हतं हस्तांदोलन
यापूर्वी, आशिया कप 2025 दरम्यान, सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा सोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला, ज्यामुळं बराच वाद निर्माण झाला. या काळात, टीम इंडियानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वीनं ट्रॉफी सोबत नेली. हा वाद अद्याप सुटलेला नाही. त्यातच आता भारतीय महिला संघानंही पुरुष संघाप्रमाणेच भूमिका घेतली आहे.
महिला संघ वनडेत अपराजित
पाकिस्तान महिला संघानं अद्याप एकाही वनडे सामन्यात भारतीय महिला संघाला पराभूत केलेलं नाही. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 11 वनडे सामने झाले आहेत, त्यापैकी सर्व सामने भारतीय महिला संघानं जिंकले आहेत. दोन्ही संघांनी वनडे विश्वचषकात चार सामने खेळले आहेत, त्यापैकी सर्व सामने टीम इंडियानं जिंकले आहेत. आता, टीम इंडिया हा सामना जिंकून आपली अपराजित मालिका सुरु ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
भारतीय महिला संघ : प्रतिक रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी
पाकिस्तान महिला संघ : मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल