Umpires stopped match : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लीगचा 27वा सामना अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर यांच्यात खेळला गेला. पावसामुळं सामना थांबवावा लागला, ज्यामुळं बराच वाद निर्माण झाला. सिडनी थंडर विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, त्यांना फक्त तीन धावांची आवश्यकता होती, तेव्हा पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळं सामना अनिर्णित झाला आणि वाद उफाळला.
पावसामुळं सामना प्रभावित :
सुरुवातीपासूनच खराब हवामानाचा सामना प्रभावित झाला. पावसामुळं सामना प्रत्येक संघासाठी फक्त पाच षटकांचा करण्यात आला. हवामान सुधारल्यानंतर, सिडनी थंडरनं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अॅडलेड स्ट्रायकर्सनं प्रथम फलंदाजी करताना 45 धावा केल्या. लॉरा वोल्वार्डनं 13 चेंडूत 22 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शबनीम इस्माइल आणि चामारी अटापट्टूनं चांगली गोलंदाजी केली, ज्यामुळं अॅडलेडला जास्त धावा करण्यापासून रोखले. एकत्रितपणे, त्यांनी फक्त 11 धावा दिल्या.
No one can believe it! With the @ThunderBBL needing just 3 runs to win, the match was abandoned 🫣 #WBBL11 pic.twitter.com/Azh7FoAcCz
— Weber Women’s Big Bash League (@WBBL) November 28, 2025
सिडनी थंडरची आक्रमक सुरुवात :
त्यानंतर सिडनी थंडरनं फलंदाजीला सुरुवात केली. फोबी लिचफिल्डनं आक्रमक फलंदाजी केली आणि पहिल्या दोन षटकातच 35 धावा केल्या. डार्सी ब्राउनच्या एकाच षटकात लिचफिल्डनं पाच चौकार मारले. परिणामी 2.5 षटकांनंतर संघाचा स्कोअर 43 होता, संघाच्या विजयासाठी फक्त तीन धावांची आवश्यकता होती. थंडरच्या संपूर्ण डावात हलका पाऊस पडला, परंतु जेव्हा संघ विजयाच्या जवळ होता तेव्हा पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळं सामना अनिर्णित झाला. टी-20 क्रिकेटमध्ये निकालासाठी किमान पाच षटके खेळली पाहिजेत.
हे ही वाचा : नव्या वर्षाच्या सुरुवातीला रंगणार WPL चा थरार… 2 मैदानांवर 28 दिवसांत होणार 22 सामने, BCCI ची घोषणा
अंपायरच्या निर्णायावर टीका :
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू कॅलम फर्ग्युसन या निर्णयावर संतापला आणि त्यानं पंचांच्या निर्णयाला “लज्जास्पद” म्हटलं. इतर समालोचक आणि प्रेक्षकांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आधी पाऊस पडत असताना खेळ का चालू राहिला, शेवटच्या क्षणी थांबवण्यात आला. प्रसारकांनी असंही वृत्त दिलं की खेळ थांबण्याच्या वेळी पाऊस इतका जोरदार नव्हता जितका आधीच्या षटकांमध्ये होता जेव्हा खेळ अखंड चालू होता.












