Maharashtra Healthcare System : अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. उपचारासाठी आलेल्या एका महिलेने आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी विनवण्या केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. एक महिला आपल्या पतीला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात घेऊन आली होती. पतीची प्रकृती खालावलेली असल्याने तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
महिलेने तिथे असलेल्या वॉर्ड बॉय, नर्स आणि डॉक्टरांकडे मदतीची विनंती केली. मात्र कोणीही लक्ष दिले नाही, मग तिने आपल्या पतीला पाठीवर घेत दवाखान्यातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी धावपळ केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढला. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. सर्वोपचार रुग्णालय हे जिल्ह्यातील प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र असून दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशा ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रुग्णालयात स्ट्रेचर किंवा व्हिलचेअर नाही यापेक्षा मोठा पराभव काय?
अकोल्यातील रुग्णालयातील संतापजनक घटनेने अवघ्या महाराष्ट्राच्या छातीत धडकी भरवली आहे. एका बाजूला आपण डिजिटल इंडियाच्या गर्जना करतो, मोठ्या योजनांचे फलक लावतो, तर दुसऱ्या बाजूला एका मेंदूचा झटका आलेल्या गरीब रुग्णाला दोन पावले नेण्यासाठी साधे स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरही मिळू नये, यापेक्षा मोठा पराभव दुसरा कोणताही असू शकत नाही. ही केवळ एखादी तांत्रिक चूक नाही, तर ही या गरीब विरोधी आणि थंड पडलेल्या आरोग्य व्यवस्थेची क्रूर क्रूरता आहे. या रुग्णालयामध्ये पांढऱ्या कपड्यांमधील कर्मचारी फिरत होते, पण कोणाचेही हात त्या माऊलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाहीत.
श्रीमंत किंवा राजकीय नेत्यांसाठी पंचतारांकित रुग्णालयांचे दरवाजे खुले असतात
आरोग्य विभागाच्या या निष्काळजीपणावर आणि ढिसाळ कारभारावर आज संपूर्ण स्तरातून तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. जेव्हा एखादा श्रीमंत किंवा राजकीय नेता आजारी पडतो, तेव्हा त्याच्यासाठी तातडीने अत्याधुनिक रुग्णवाहिका, विशेष डॉक्टरांचे पथक आणि पंचतारांकित रुग्णालयांचे दरवाजे एका मिनिटात उघडतात. पण तोच जेव्हा एखादा गरीब, कष्टकरी, आदिवासी आपल्या घामाचा पैसा कर रूपाने देतो आणि हक्काच्या सरकारी रुग्णालयात येतो, तेव्हा त्याला माणसासारखी वागणूकही मिळत नाही. जर तुमच्याकडे वॉर्डबॉयला देण्यासाठी लाच नसेल, जर तुम्हाला केस पेपर काढण्याचे नियम माहित नसतील, तर तुम्हाला मरणाच्या दारात सोडून दिले जाते.
एका पाय तुटलेल्या महिला रुग्णाला तिच्या नातेवाईकांनी चक्क जमिनीवरून फरफटत नेले
हा धक्कादायक प्रकार काही पहिलाच नाही. यापूर्वीही महाराष्ट्रात आणि देशात अशा अनेक काळजाला घर पाडणाऱ्या घटना घडल्या आहेत, ज्यांनी या आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवल्या आहेत. महाराष्ट्रातीलच एका हॉस्पिटल मध्ये काही वर्षांपूर्वी स्ट्रेचर न मिळाल्यामुळे एका पाय तुटलेल्या महिला रुग्णाला तिच्या नातेवाईकांनी चक्क जमिनीवरून फरफटत ओढत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच, नागपूर GMCH मध्ये व्हीलचेअर न मिळाल्यामुळे नातेवाईक आपल्या आजारी माणसांना चक्क कडेवर उचलून वॉर्डमध्ये पळवतानाची दृश्ये वारंवार समोर आली आहेत. देशाच्या इतर भागांत तर हतबल नातेवाईकांना आपल्या लोकांचे मृतदेह खांद्यावर घेऊन मैलोन्मैल पायी जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले जातात, समित्या नेमल्या जातात, पण प्रत्यक्षात गरिबांच्या नशिबातील हाल काही संपत नाहीत.






