जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंग रुग्णालयात (एसएमएस हॉस्पिटल) मोठी दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर पहाटे अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या सहा रुग्णांचा यात मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काय म्हणाले कॉलेजचे प्राचार्य :
सवाई मानसिंग रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक माहेश्वरी यांनी सांगितलं की, आग आणि गुदमरल्यामुळं यात सहा जणांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की आयसीयूमधून अचानक धूर येऊ लागला. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. परंतु सुरुवातीला कोणीही पोहोचलं नाही. हळूहळू, संपूर्ण ट्रॉमा सेंटर धुरानं भरुन गेल्यानंतर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर होऊन अनेक रुग्णांची प्रकृती बिघडली.
VIDEO | Rajasthan CM Bhajanlal Sharma visited the trauma centre of the state-run Sawai Man Singh (SMS) Hospital in Jaipur, where a fire broke out on Sunday night, killing six critical patients.
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRAShcC) pic.twitter.com/PWyQEKufa5
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2025
मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल :
घटनेची माहिती मिळताच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे मंत्री जवाहर सिंह बेडम यांच्यासोबत तातडीनं रुग्णालयात पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण अहवाल मागववून मदत कार्याचा आढावा घेतला. भजनलाल शर्मा यांनी सांगितलं की, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
अग्निशमन दलाकडून काही तासांनंतर आग आटोक्यात :
अग्निशमन दलाची सुमारे सहा पथकं घटनास्थळी उपस्थित होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे दोन तास लागले. आग आटोक्यात आणल्यानंतर, ट्रॉमा सेंटरमधील सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. तसंच खबरदारी म्हणून, रुग्णांना प्राथमिक उपचार देण्याकरिता रुग्णालयाबाहेर डॉक्टरांची एक टीम तैनात करण्यात आली.
सहा जणांचा मृत्यू, तपास सुरु :
सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक माहेश्वरी यांनी सांगितलं की जखमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. अनुराग धाकड यांनी सहा जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. आयसीयूमध्ये 11 रुग्ण होते. तर शेजारील आयसीयूमध्ये 13 रुग्ण होते.