पुणे : आज पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता पिंपरी चिंचवड महापालिकेला नवीन आयुक्त कोण मिळणार हा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली नाशिक येथे झाली आहे. यासंदर्भातील आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता ते लवकरच नाशिकच्या महापालिकेत रुजू होणार आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्यावर नाशिक येथील कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी एकूण 3 वर्षे 2 महिन्यांपर्यंत कार्यकाळ पूर्ण केला.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध विकासकामे, प्रशासनिक सुधारणा आणि नागरी सुविधांच्या उभारणीवर भर देण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले.
यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार आयुक्त शेखर सिंह यांच्यानंतर कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर देखील तोडगा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या बदलीनंतर आयुक्त पदाचा तात्पुरता कार्यभार पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय. त्यानुसार ते पुढील आदेश येईपर्यंत हा पदभार स्वीकारत आहे. यापूर्वी देखील काही कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपाचा कार्यभार श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.