विशाखापट्टणम : सध्या भारतात सुरु असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषकातील दहाव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन विकेटनं पराभव पत्करावा लागला. टीम इंडियानं पहिले दोन्ही सामने जिंकले होते आणि सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात होते, मात्र त्यांना 3 विकेटनं पराभवाचा सामना करावा लागला.
नॅडिन डी क्लार्कची दमदार खेळी :
सामन्यात भारतानं दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 142 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर नॅडिन डी क्लार्क आणि क्लोई ट्रेऑन यांच्यातील सातव्या विकेटसाठी 69 धावांच्या भागीदारीनं सामन्याची रंगत पूर्णपणे बदलली. दक्षिण आफ्रिकेनं 48.5 षटकांत लक्ष्य गाठलं आणि स्पर्धेतील त्यांचा दुसरा विजय मिळवला. त्यांच्या विजयानं गुणतालिकेतही लक्षणीय बदल झाला.
रिचा घोषची शानदार खेळी :
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 49.5 षटकांत 251 धावा केल्या होत्या. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषनं सर्वाधिक 94 धावांची शानदार खेळी खेळली. भारतानं मंधाना (23) आणि प्रतिका रावल (37) यांच्या भागीदारीनं सुरुवात केली, परंतु मधल्या षटकांत विकेट्स पडण्याची मालिका सुरु झाली. एकेवेळी संघाची धावसंख्या 6 बाद 102 अशी होती. यानंतर रिचा, अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांनी भारताला सावरलं. स्नेहसोबत रिचानं 88 धावांची भागीदारी करुन भारताला 251 धावापर्यंत पोहोचवलं, परंतु ती शतकापासून फक्त सहा धावांनी कमी पडली.
टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर कायम :
महिला वनडे विश्वचषकात 10 सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियन संघ 5 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लंड 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तीन सामन्यांत दोन विजय आणि एका पराभवानंतर टीम इंडिया अजूनही 0.953 च्या नेट रन रेटसह 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं आता -0.888 च्या नेट रन रेटसह चार गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.