गेल्या काही दिवसांपूर्वीपासून सुरु असलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू बाबत रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर सुरु असलेल्या चर्चा प्रचंड गाजत आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाने या आरोपांना फेटाळून लावत चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावर आता रामदास कदम सारवासारव करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दसरा मेळाव्याच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटाचा दशहरा मेळावा पार पडला. याचवेळी शिंदे गटाने देखील दशहरा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत गूढ सत्य सांगितले होते. यावर आता रामदास कदम यांनी केलेल्या आरोपानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर जे घडलं, त्यावरून मी फक्त काही शंका व्यक्त केल्या होत्या, बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करण्याचा माझा कोणताही हेतू नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
रामदास कदम यांनी जी थुंकी उडवली..
यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ‘मला असं वाटतं, रामदास कदम यांनी जी थुंकी उडवली, ती त्यांना गिळावीच लागणार आहे. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडली आहे. रामदास कदम यांच्यानंतर खडसे आणि त्यांच्या चिरंजीव वेगळेच घोटाळे करत आहे, अशा पद्धतीने मंत्री जर काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी घेऊन चालत असल्याचे म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली आहे.
आत्तापर्यंत किती शस्त्र परवाने दिले?
गेल्या काही दिवसांपासून निलेश घायवळ प्रकरण प्रचंड गाजत आहे. निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ याला दिलेल्या शस्त्र परवान्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता संजय राऊतांनी यावर टीका केली आहे. ‘योगेश कदम यांनी घायवळला शस्त्रपरवाना दिला, आत्तापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? आयुक्तांनी शस्त्र परवाना नाकारलेला असतानाही गृहराज्यमंत्री जर परवाना देत असतील तर फडणवीस हे सरकार नव्हे गुंडाची टोळी चालवत असल्याची टीका त्यांनी केली आहे.