Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • माओवाद पर्वाच्या समाप्तीची सुरुवात; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर
गुन्हा

माओवाद पर्वाच्या समाप्तीची सुरुवात; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर

गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून मावोवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरिष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद १०० टक्के हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असून हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिक बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह व माओवादी गणवेशात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.

यावेळी पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला, राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय रिझर्व पुलिस बल उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात प्रामुख्याने उपस्थित होते.

ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास

मुख्यमंत्री म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून मावोवाद चळवळ उभी करणाऱ्या भूपतीसारख्या वरिष्ठ माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. “ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे, आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिल्या गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे, आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनी जे काही ८ ते १० माओवादी शिल्लक आहेत, त्यांना आत्मसमर्पण करून मुख्य धारेत येण्याचे आवाहन केले, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.

समता केवळ संविधानातूनच

मुख्यमंत्र्यांनी गेल्या ४० वर्षांपासून दंडकारण्याच्या या भागातील गडचिरोलीची माओवादाशी सुरू असलेली लढाईबाबत सांगितले, यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला. ‘पिपल्स वॉर ग्रुप’ सुरू झाल्यापासून माओवादी सक्रिय झाले आणि त्यांनी येथील युवकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध संभ्रम निर्माण करून, संविधान-निर्मित व्यवस्था उलथून नवीन व्यवस्था सुरू करण्याचे स्वप्न दाखवले. मात्र समता व न्याय फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी चळवळीच्या नादी लागलेले आता आत्मसर्पण करत आहेत.

आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही

आत्मसमर्पण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. “संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, “प्रत्येकाचे उचित पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही” अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना येथील उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असून, भविष्यातही रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या आत्मसमर्पणानंतर सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारची रणनीती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माओवादाविरुद्ध ठरवलेल्या धोरणाचे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत माओवाद संपवण्यासाठी केलेल्या रणनीतीचे कौतुक केले. या धोरणात आत्मसमर्पणातून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलिस कारवाईला सामोरे जाणे हे दोनच पर्याय ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात माओवादाचे उच्चाटन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन आणि पुरस्कार

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांनी सातत्याने मावोवादविरूद्ध मोहिम आखून माओवादाला जेरबंद व नेस्तनाबूत केले आणि विकास कामांतून नवीन माओवाद्यांची भरती बंद केली, याबद्दल पोलिस दलाचे आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांनी गडचिरोली पोलिस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. सोबतच पुढील दोन ते अडीच वर्षे सजग राहण्याचे आणि लोकांचा यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक एम रमेश यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला संबंधीत अधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts