नाशिक : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घराण्यातील राजकीय समीकरणात आज मोठा बदल घडणार आहे. त्यांच्या सख्ख्या भावानं भारत कोकाटे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. सिन्नर तालुक्यात मोठ्या राजकीय वजनदार नेत्यांपैकी एक असलेल्या भारत कोकाटेंच्या या निर्णयामुळं स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. हा प्रवेश केवळ एका व्यक्तीचा नसून, ठाकरे गटासाठी सिन्नरमध्ये तो मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपाची रणनीती फळाला :
भारत कोकाटे यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करुन सिन्नरमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सोमठाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी पदाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आता त्यांचा भाजपामध्ये प्रवेश म्हणजे ठाकरे गटासाठी सिन्नरमध्ये राजकीय डोकेदुखी ठरणार आहे. राज्यात सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं पुन्हा एकदा स्थानिक प्रभावशाली चेहरे पक्षात आणा ही रणनीती राबवली आहे. कोकाटेंचा हा प्रवेश त्या धोरणाचा भाग मानला जात असून, सिन्नरच्या निवडणुकीतील गणित पूर्णपणे बदलू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरातूनच विरोधाची ठिणगी :
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या सख्ख्या भावाकडून विरोधाचा सामना करावा लागणं ही काही नवीन बाब नाही. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये राजकीय मतभेद वाढलेले दिसतात. जिल्हा मजूर संघ आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारत कोकाटे यांनी आपल्या भावाच्या उमेदवारांना पराभूत करत आपली ताकद दाखवून दिली होती. याशिवाय, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी माणिकराव कोकाटेंवर केला होता. आता त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर मंत्री कोकाटे यांच्यासमोर आणखी कठीण समीकरण उभं राहिलं आहे. दरम्यान, कोकाटेंच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांची जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारी निश्चित मानली जात असताना, घरातील हा राजकीय भाऊगर्दीचा संघर्ष आगामी निवडणुकीत नवी कलाटणी देऊ शकतो.
अंतर्गत संघर्ष की राजकीय रणनीती? :
भारत कोकाटे यांचा भाजपा प्रवेश हा केवळ वैचारिक बदल आहे की भावाच्या वाढत्या प्रभावाला दिलेलं प्रत्युत्तर, हा प्रश्न आता सिन्नरच्या राजकारणात गाजत आहे. मात्र इतकं नक्की या घरगुती मतभेदांनी राज्यातील सत्तासमीकरणांवर परिणाम होणार असून, सिन्नर आता महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचं नविन केंद्र बनलं आहे.