पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूंमुळं संतापाची लाट उसळली आहे. बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटीत चिकन मसाल्याचा समावेश असल्याचं उघडकीस आलं आहे. यानंतर वारकरी संप्रदाय आणि मंदिर भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं महत्त्वाचं केंद्रस्थान मानलं जातं, जिथं लाखो वारकरी पायी वारी करत माऊली माऊलीचा गजर करतात. अशा ठिकाणी मांसाहाराशी संबंधित पदार्थ भेटवस्तू म्हणून देण्यात आल्यानं भक्तांचा भावनिक संताप वाढला आहे.
का झाला वाद :
वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा यावर भर दिला जातो. मांसाहार किंवा त्यासंबंधित वस्तू तिथं स्थान पावतच नाहीत. त्यामुळं बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याचं पाकीट भेट स्वरुपात दिलं जाणं अनेक भक्तांना खटकलं आहे. प्राप्त झालेल्या भेटवस्तूंमध्ये कंपनीची इतर उत्पादनंही होती, मात्र चिकन मसाल्याच्या समावेशामुळं वाद अधिक उठला आहे.
माहितीनुसार, मंदिरातील सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सेवा बीव्हीजी कंपनी आऊटसोर्सिंग पद्धतीनं पुरवते. या कंपनीला पंढरपूर विठ्ठल मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याचा ठेका मिळाला आहे. मे महिन्यापासून मंदिरातील सुरक्षा व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी बीव्हीजीकडे आहे. ठेकेपूर्वीच्या सुरक्षारक्षक एजन्सीकडून नियम न पाळल्यामुळं त्यांचा ठेका रद्द करण्यात आला होता, त्यानंतर मंदिरानं निविदा प्रक्रिया करुन बीव्हीजी कंपनीला ठेका दिला.
बीव्हीजीकडे मंदिरातील जवळपास 220 सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी असून हे रक्षक दर्शन रांग आणि परिसरातील विविध ठिकाणी तैनात केले जातात. तसंच यात्रेच्या काळात अतिरिक्त सुरक्षारक्षकांची व्यवस्था ही कंपनीकडंच राहणार आहे. या नियमांचं काटेकोर पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजीवर असून, चिकन मसाल्याच्या भेटवस्तूच्या घटनेनं आता कंपनी आणि भक्तांमध्ये तणाव निर्माण केला आहे.