मुंबई
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. पुणे ते नांदेडदरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरु करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या हायस्पीड ट्रेनमुळं प्रवासाचा कालावधी जवळपास अर्ध्यावर येणार असून, आरामदायी आणि जलद सेवा अनुभवण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनचं जाळे वाढत असताना, महाराष्ट्रातही हा नवा अध्याय सुरु होणार आहे.
डिसेंबरपासून धावणार नियमित सेवा
नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे–नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी सकारात्मकरीत्या स्वीकारली आहे. रेल्वेच्या सूत्रांनुसार, या ट्रेनची प्राथमिक चाचणी नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर नियमित सेवा डिसेंबरपासून सुरु होईल. या घोषणेनंतर पुणे आणि नांदेडच्या नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक कोचमध्ये एसी चेअर कार, एक्झिक्युटिव्ह क्लास, फोल्डिंग सीट्स, वाय-फाय, मोबाईल चार्जिंग पॉईंट आणि स्वयंचलित दरवाजे असतील. संपूर्ण ट्रेन सीसीटीव्ही देखरेखीखाली राहील, तर सुरक्षा आणि स्वच्छतेसाठीही आधुनिक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या मार्गावरील संभाव्य थांबे म्हणून नांदेड, लातूर आणि धाराशिव ही स्थानकं निश्चित आहेत.
प्रवास भाडं आणि वेळ
सध्या पुणे–नांदेड रेल्वे प्रवास साधारण 11 ते 12 तासांचा ठरतो. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळं हा कालावधी फक्त 6 ते 7 तासांवर येईल. प्राथमिक माहितीनुसार चेअर कारचं भाडं सुमारे ₹1500 ते ₹1800, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचं ₹2200 ते ₹2500 इतकं असू शकते. त्यामुळं प्रवाशांना वेळेची बचत आणि आरामदायी प्रवास दोन्ही मिळणार आहेत.
उद्घाटनाची प्रतीक्षा शिगेला
रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत उद्घाटनाची तारीख आणि वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. याची विविध स्थानकांवर तयारी सुरु असून, पुणे–नांदेड मार्गावरील प्रवाशांसाठी ही वंदे भारत सेवा ‘फास्ट ट्रॅक’वरील नवा अध्याय ठरणार आहे.








