Reimagining Manufacturing Maharashtra : महाराष्ट्र भविष्यात ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा होणार असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. आज पुणे येथे ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग: इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या रिपोर्टचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. आर. सुब्रमण्यम व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुण्याने गेल्या दशकभरात जी मॅन्यूफॅक्चर इकोसिस्टिम तयार केली आहे, ती देशात एक आदर्श उदाहरण बनली आहे. मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे आपल्याला जर अजून वृद्धी हवी असेल, तर ती आपल्याला जुन्या व्यवसाय पद्धतीने मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला नव्या विचारांनी पुढे जावं लागेल, जिथे फ्रंटिअर टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा – खडसेंच्या घरातील चोरीने पोलिसही हदरले, सीडी, पेन ड्राईव्ह आणि महत्त्वाचे कागदपत्रं चोरीला..
टेक्नॉलॉजीच्या नव्या क्रांतिकारीपर्वात आपण लीडर बनू
एआय, क्वांटम कम्प्यूटिंग आणि सेमिकंडक्टर या तीन स्तंभांमुळे मॅन्यूफॅक्चरिंग असो किंवा कोणताही व्यवसाय असो, खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. वेगवेगळ्या रणनितींचा वापर करून या स्तंभांना आकर्षित करण्याचा आपला मानस आहे. तसेच फ्रंटिअर टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे मिलन, जेव्हा हे मिलन आपण मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये आणू त्यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि संपर्क व्यवस्था, सक्षम पायाभूत सुविधा यांमुळे आपण जागतिक स्पर्धक तर बनूच, पण टेक्नॉलॉजीच्या नव्या क्रांतिकारीपर्वात आपण लीडर देखील बनू, असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.
विकसित महाराष्ट्र 2047′ व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता
महाराष्ट्राला खूप मोठी संधी आहे, जसे भारताला आपण जागतिक लीडर बनवू इच्छितो, तसेच भारतात महाराष्ट्र लीडर बनेल. यासाठी राष्ट्रीय मिशनला संलग्न स्टेट मिशनही आणत आहोत. तसेच कालच मंत्रिमंडळ बैठकीत नीती आयोगाच्या मदतीने तयार केलेले ‘विकसित महाराष्ट्र 2047’ व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता दिली असून, हा एक प्रकारचा विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र सर्जनशील आणि तंत्रज्ञानावर आधारित
आज जेव्हा मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रात भारताला जागतिक पसंती मिळत आहे, त्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. चांगली संपर्क व्यवस्था, सक्षम पायाभूत सुविधा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलेल्या ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’मुळे महाराष्ट्र सर्जनशील आणि तंत्रज्ञानावर आधारित बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करत राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.






