17-year-old cricketer death : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून दुःखद बातमी समोर आली आहे. 17 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन ऑस्टिनला नेटमध्ये सराव करताना डोक्याला चेंडू लागला आणि त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. यामुळं क्रिकेट जगतात दुःखाची लाट पसरली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून शोक व्यक्त :
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बेन ऑस्टिनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “नेटमध्ये फलंदाजी करताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 17 वर्षीय मेलबर्न क्रिकेटपटू बेन ऑस्टिनच्या दुःखद मृत्यूनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे.” क्रिकेट व्हिक्टोरियानंही शोक व्यक्त केला आहे, त्यांनी लिहिलं आहे की, “ऑस्टिन कुटुंब, बेनचे सहकारी, फर्न्ट्री गली क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन क्रिकेट समुदायासोबत आमच्या संवेदना आहेत.”
Vale Ben Austin.
Cricket Australia is devastated at the passing of 17-year-old Melbourne cricketer Ben Austin following an accident while batting in the nets on Tuesday night. pic.twitter.com/zBifuqrrRG
— Cricket Australia (@CricketAus) October 30, 2025
सरावादरम्यान डोक्याला लागला चेंडू :
फर्न्ट्री गली क्रिकेट क्लब आणि एल्डन पार्क यांच्यातील टी-20 सामन्यापूर्वी बेन ऑस्टिन नेटमध्ये वॉर्म अप करत होता. यादरम्यान, एक चेंडू त्याच्या डोक्यावर थेट लागला आणि तो जखमी झाला. सहकारी खेळाडू ताबडतोब त्याच्या मदतीला धावले. आग्नेय मेलबर्नमधील फर्नट्री गली येथील व्हॉली ट्यू रिझर्व्ह मैदानावर नेट प्रॅक्टिस सुरु होती.
व्हेंटिलेटरवर होता बेन ऑस्टिन (17-year-old cricketer death)
चेंडू डोक्याला लागल्यावर बेन ऑस्टिनला ताबडतोब घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले. काही मिनिटांतच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथं त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. रिंगवुड आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मायकेल फिन यांनी बेन ऑस्टिनला सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र ऑस्टिन अखेर जीवनाची लढाई हरला.












