Sikander Sheikh arrested : महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो पापला गुर्जर टोळीशी संबंधित होता आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्रे खरेदी करून पंजाबला पुरवणाऱ्या साखळीत मध्यस्थ म्हणून काम करत होता.
कोल्हापूरच्या गंगावेश प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेला आणि महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए टीमने पापला गुर्जर टोळीसाठी शस्त्र पुरवठा करणारे रॅकेट उघडकीस आणले आणि सिकंदर शेखसह चार जणांना अटक केली.
हे ही वाचा – भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा भिडणार, कधी आणि कुठं होणार सामना?
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटक केलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पापला गुर्जर टोळीशी थेट जोडलेले आहेत. आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून पंजाब आणि आसपासच्या भागात त्यांचा पुरवठा करत होते. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तीन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे आढळून आले, तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
विमानतळ चौकातून तिघांना अटक
दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोन शस्त्रांसह एका एसयूव्हीमधून मोहाली येथे आले. त्यांना ही शस्त्रे सिकंदर शेखला पोहोचवायची होती, तर सिकंदरने ती नयागाव येथील कृष्णा उर्फ हॅपीला देण्याची योजना आखली होती. पोलिसांनी तिघांनाही विमानतळ चौकातून अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे २६ ऑक्टोबर रोजी कृष्णा कुमार उर्फ हॅपीलाही अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी
सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीर आहे. तो क्रीडा कोट्यातून सैन्यात सामील झाला पण त्यानंतर लवकरच त्याने नोकरी सोडली. तो बीए पदवीधर आहे, विवाहित आहे आणि गेल्या पाच महिन्यांपासून मुल्लानपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो शस्त्रास्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थ म्हणून काम करत होता.
कुस्ती जगतात खळबळ
सिकंदर शेख हा कोल्हापूरमधील गंगावेश प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षित कुस्तीगीर आहे आणि त्याने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद जिंकले होते. त्याच्या अटकेमुळे कुस्ती विश्वात आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.












