Namdev Shirgaonkar anticipatory bail : 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या महासचिवांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात 28 ऑक्टोबरला गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये निधीचा गैरवापर आणि आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप होते. यावर आता पुणे सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून येत्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत ते सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने ऑलम्पिक असोसिएशनला विविध राष्ट्रीय खेळामधील खेळाडूंच्या सहभागासाठी एकूण 12.45 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्ती असोसिएशनचे कार्याध्यक्ष संदीप भोंगळे यांनी महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी शिरगावकर यांच्यावर आरोप लगावले होते की, सरकारकडून मिळालेल्या निधीचा कोणताही हिशोब शिरगावकर यांनी दिलेला नाही. सरकारकडून मिळालेली रक्कम ही सहकारी आणि नातेवाईकांशी कंपनी संस्थांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आली आहे.
या आरोप प्रत्यारोपानंतर खेळ आणि युवक सेवा संचालनालयाने त्यांना ऑडिट रिपोर्ट जमा करण्यास सांगितले होते. परंतु शिरगावकरांनी कोणताच रिपोर्ट सादर केला नाही. त्यानंतर कुस्ती असोसिएशनच्या सदस्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर शिरगावकरांची बाजू मांडण्यात आली. यावेळी त्यांचे वकील म्हणाले की, संपूर्ण प्रकरण हे कागदपत्रावर आधारित असून शिरगावकरांनी तपास एजन्सीला सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच पूर्ण केलेले होते.
महासचिव म्हणून शिरगावकरांनी गुजरात मध्ये आलेल्या 36व्या राष्ट्रीय खेळ आणि गोव्यात झालेल्या 37व्या राष्ट्रीय खेळाडू ऑडिट रिपोर्ट जमा करण्यात आल्याचं देखील वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं. यावर कोर्टाने निर्णय दिला की, शिरगावकरांच्या वकिलांनी दिलेले पुरावे ग्राह्य धरत शिरगावकर यांना अटक पूर्ण जामीन मंजूर करण्यात येत आहे. याशिवाय शिरगावकरांना चौकशीसाठी पोलीस हवं तेव्हा बोलवू शकतात. परंतु त्यासाठी 48 तासांपूर्वी नोटीस देणे आवश्यक असेल. (Namdev Shirgaonkar anticipatory bail)












