प्रतिनिधी |इकबाल शेख : वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे दारूबंदी असतानाही नकली दारू तयार करून सर्रास विक्री केली जात असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जय बेलखडे यांनी हा बेकायदेशीर दारू बनविण्याचा अड्डा पकडून समाजाच्या आरोग्याशी सुरू असलेला हा घाणेरडा खेळ समोर आणला आहे.
बाहेरून आणल्याचा बनाव (Fake Alcohol Sale Youth Health)
या ठिकाणी मध्यप्रदेशाचे स्टॅम्प असलेले स्टिकर बाटल्यांवर लावले जात होते. तपासात एमपी व गोव्याच्या नावाने असलेल्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. यावरून बनावट पद्धतीने दारू तयार करून ती बाहेरून आणल्याचा बनाव करून विकली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नकली दारूचे सेवन केल्याने तरुणांच्या जीवाला धोका
विशेष म्हणजे, वर्धा जिल्हा हा अधिकृत दारूबंदी जिल्हा असताना हा प्रकार दीर्घकाळ सुरू होता. नकली दारूचे सेवन केल्याने तरुणांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे. अशा दारूमुळे गंभीर आजार, अंधत्व किंवा मृत्यूसारखे परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप
या संपूर्ण प्रकरणात कारंजा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा (LCB) टीमची निष्क्रिय भूमिका उघड झाली असून, त्यांच्या दुर्लक्षामुळेच हा अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नकली दारू रॅकेटचा पूर्णपणे बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक नागरिकांनी केली आहे.












