India u19 : आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 च्या सातव्या सामन्यात, भारतानं डकवर्थ-लुईस (डीएलएस) पद्धतीनं बांगलादेशचा 18 धावांनी पराभव करुन स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह, भारतीय संघानं गट अ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. एकेकाळी असं वाटत होतं की भारत सामना गमावेल, परंतु भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं आणि संघाचा विजय निश्चित केला.
सूर्यवंशी आणि कुंडूची दमदार फलंदाजी :
सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, कर्णधार आयुष म्हात्रे (6) लवकर बाद झाला. मात्र, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं नंतर इतिहास रचला. त्यानं फक्त 67 चेंडूत 72 धावांची (6 चौकार आणि 3 षटकार) धमाकेदार खेळी केली आणि 19 वर्षांखालील विश्वचषक इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. वैभव बाद झाल्यानंतर, यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूनं डावाची जबाबदारी घेतली. कुंडूनं संयमानं फलंदाजी केली आणि 112 चेंडूत 80 धावा केल्या, ज्यामुळं टीम इंडियाला 48.4 षटकांत 238 धावांचा सन्मानजनक आकडा गाठता आला. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज अल फहाद सर्वात यशस्वी ठरला, त्यानं 38 धावांत 5 बळी घेतले.
सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय :
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं सावध सुरुवात केली. मात्र पावसामुळं सामन्यात दोनदा व्यत्यय आला आणि दुसरा डाव 29 षटकांपर्यंत कमी झाला. डीएलएस नियमांनुसार, बांगलादेशला विजयासाठी 29 षटकांत 165 धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं.
भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी :
बांगलादेशचा कर्णधार अझीजुल हकीम तमीम (51) आणि रिफत बेग (37) यांच्या फलंदाजीमुळं बांगलादेश एका वेळी मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र, सामन्याच्या शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. विहान मल्होत्रानं एका घातक स्पेलमध्ये चार महत्त्वपूर्ण विकेट घेत सामना उलटला. खिलन पटेलनं बांगलादेशचा कर्णधार तमीमला बाद करुन भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शेवटी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 144 धावांवर गुंडाळले आणि सामना जिंकला.







