Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विराटचं शतक पाण्यात, इंदूरमध्ये टीम इंडियाचा मानहानिकारक पराभव; कीवींनी जिंकली पहिली मालिका
Top News

विराटचं शतक पाण्यात, इंदूरमध्ये टीम इंडियाचा मानहानिकारक पराभव; कीवींनी जिंकली पहिली मालिका

NZ Beat IND

NZ Beat IND : भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. इंदूरमध्ये खेळलेला निर्णायक सामना न्यूझीलंडनं 41 धावांनी जिंकला. न्यूझीलंडनं मालिकाही 2-1 अशी जिंकली. भारतात न्यूझीलंडनं वनडे मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे विशेष. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं 8 विकेट्सवर 337 धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताचा डाव 296 धावांवर गुंडाळला गेला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतानं वनडे सामन्यात पराभव पत्करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी संघानं या मैदानावर सर्व सात सामने जिंकले होते.

विराट कोहलीचं 85वं शतक व्यर्थ :

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं 85वं शतक आणि 54वं वनडे शतक झळकावलं. त्यानं 108 चेंडूत 124 धावांची खेळी केली. त्याला नितीशकुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकांसह चांगली साथ दिली, परंतु तरीही, भारताचा डाव 46व्या षटकात गुंडाळला गेला. विराट कोहली आणि रेड्डी यांनी 88 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली, तर त्यानं आणि राणानं 69 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. कीवींकडून जॅकेरी फॉल्क्स आणि क्रिस्टन क्लार्क यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. जेडेन लेनिक्सनं दोन बळी घेतले.

कीवींनी उभारली मोठी धावसंख्या :

सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. अर्शदीपनं पहिल्या षटकात हेन्री निकोल्सला बाद केलं आणि हर्षितनं दुसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेला बाद केलं. विल यंगच्या रुपात संघाची तिसरी विकेट 58 धावांवर पडली. पाहुण्या संघ अडचणीत सापडला. मात्र यानंतर डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सनं चौथ्या विकेटसाठी 219 धावांची त्यांची उत्कृष्ट भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी आपापली वयक्तिक शतकं पुर्ण केली. परिणामी कीवींनी 50 षटकांत 8 बाद 337 धावांपर्यंत मजल मारली. डॅरिल मिशेलनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील नववं शतक झळकावलं. हे त्याचं भारताविरुद्धचं चौथं शतक आणि मालिकेतील त्याचं सलग दुसरं शतक होतं. त्यानं 131 चेंडूत 3 षटकार आणि 15 चौकारांसह 137 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सनही त्याचं दुसरं वनडे शतक झळकावलं. त्यानं 88 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 106 धावा केल्या. विल यंगनं 30 धावा केल्या आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेल 28 धावांवर नाबाद राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts