Mumbai Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निकालानंतर महापौरपदावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांचा उद्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देणं असल्याचं बोललं जात आहे.
2017 ची पुनरावृत्ती होणार? :
महापौर निवडीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळं 2017 मधील परिस्थितीची पुनरावृत्ती होईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. 2017 साली भाजपानं महापौरपदासाठी माघार घेत ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाजपानं सत्तेत सहभागी न होता ‘पहारेकरी’ची भूमिका स्वीकारली होती आणि विरोधी पक्षनेतेपदही घेतलं नव्हते. परिणामी, ते पद काँग्रेसकडे गेलं होतं.
दोन्ही पक्षाकडून खुलासा :
मात्र सध्याच्या चर्चांबाबत दोन्ही बाजूंनी सावध भूमिका घेतली जात आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटासोबत कोणतीही अधिकृत चर्चा सुरु नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महापौरपदावरुन कोणतीही बोलणी झालेली नसल्याचा खुलासा केला आहे.
महापौरपदासाठी किती जागांची गरज :
आकडेमोड पाहिली तर मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. भाजपाकडे 89, शिंदे गटाकडे 29, तर ठाकरे गटाकडे 65 नगरसेवक आहेत. त्यामुळं भाजपासाठी शिंदे गटाची साथ अपरिहार्य ठरते. हीच बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे महापौरपद अडीच वर्षांसाठी मागण्याची रणनीती आखू शकतात, अशी चर्चा आहे.
शिंदेही सक्रीय :
दरम्यान, नगरसेवकांची संभाव्य फूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदे मुंबईत सक्रिय झाले आहेत. त्यांच्या गटाचा अधिकृत ‘गट’ स्थापन करुन गटनेते नेमण्याची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या तरुण नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत. एकूणच, मुंबईच्या महापौरपदासाठीची ही राजकीय चक्रे कोणत्या दिशेनं फिरणार, आणि अंतिम सत्ता-समीकरण कसं ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.












