Operation Tiger vs. Wolf : पुढील महिन्यात लोकसभेचे पावसाळी अधिवेशन (Loksabha Monsoon Session) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या खासदारांशी चर्चा करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची बैठक (Shivsena MP Meeting) बोलावली आहे. मात्र, या बैठकीला कोण हजर राहणार यापेक्षा कोण गैरहजर राहणार त्याचीच जास्त चर्चा रंगताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे शिंदे गटाकडून वारंवार ऑपरेशन टायगर (Opration Tiger) करण्याची आलेली विधाने महत्त्वाची ठरत आहेत.
ठाकरे गटाचे नऊ पैकी सात खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगताना दिसत आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. काही वेळापूर्वी आलेल्या माहितीनुसार शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि परभणीचे खासदार संजय जाधव या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. वाकचौरे हे नाॅट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. तर संजय जाधव हे पक्षावर मागील काही दिवसांपासून नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे दोन खासदार शिंदे गटाच्या पूर्णपणे गळाला लागल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्र्याकडून ऑपरेशन टायगरचे संकेत
काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेचा शिर्डी येथे संजय राऊत यांच्या उपस्थित मोठा मेळावा झाला. या मेळाव्याला देखील खासदार वाकचौरे उपस्थित नव्हते. आता पुन्हा एकदा बैठकीला अनुउपस्थिती हेच दर्शवते की, ऑपरेशन टायगर साठी हालचाली सुरु आहेत. त्यातच शिंदे सेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल केलेल्या विधानाने ऑपरेशन टायगरचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला प्रत्येक्षात किती खासदार हजर राहतात आणि किती गैरहजर हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू – संजय राऊत
दरम्यान, या सर्व घडामोडींवर ठाकरे सेनेच आक्रमक नेते आणि खासदार यांनी आपल्या शैलीत प्रतिवार केला आहे. शिंदे गट ऑपरेशन टायगर करणार असेल तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू असे राऊत म्हणाले आहेत. ऑपरेशन टायगर करणार असं जे म्हणतात त्यांचं ऑपरेशन अमित शाह यांनी शंभरवेळा केलं आहे. विरोधकांचे आमदार-खासदार नेते फोडलं ही एक प्रकरची विकृती आहे. २०१४ मध्ये जेव्हापासून या देशात मोदी-शाह यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आलं आहे तेव्हापासून या विकृतीने कळस गाठला आहे.
या विकृतीविरोधात जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
नेहमी संयमी असणारे आणि देशाला आदर्श निर्माण करून दाखवणारे महाराष्ट्रासारखं राज्य देखील त्यांनी नासवलं आहे. जोपर्यंत जनता हे सहन करत आहे, तोपर्यंत ठिक आहे. मात्र, एक दिवस असा येईल या राज्यातील आणि देशातील जनता या विकृतीविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी-शाह यांच्यावर लागवला आहे. त्यांच्या आरोपाला भाजप कशा प्रकारे उत्तर देतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.












