Uddhav Thackeray Shiv Sena Group Explainer: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने अत्यंत नाट्यमय आणि अभूतपूर्व वळण घेतले आहे.
ऑपरेशन टायगर मुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला एकामागून एक धक्का बसत आहे. आधी आमदार गेले, नंतर थेट दिल्लीत संसद हादरवून टाकणारा ६ खासदारांचा मोठा भूकंप झाला आणि आता मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील आजी – माजी नगरसेवकही मोठ्या संख्येने फुटण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ठाकरे गटासाठी हा ट्रिपल शॉक म्हटले जात आहे. खरंच ठाकरेंचे नगरसेवकही फुटणार का ? काय आहे शिंदेंचा पुढचा प्लान ?
मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर हुकूमत गाजवली
ज्या पक्षाने एकेकाळी मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर हुकूमत गाजवली, त्या पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आता मातोश्रीला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. या संपूर्ण राजकीय भूकंपाची सुरुवात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांचा एक मोठा गट सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तो धक्का उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरला कारण पक्षाचे बहुतांश आमदार आणि मूळ नाव आणि चिन्ह देखील त्यांच्या हातातून गेले. मात्र, त्यानंतरही ठाकरे गटाने मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सहानुभूतीवर पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत
नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनी या संघर्षाला एका नव्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या खासदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती आणि अखेर पुन्हा एकदा मोठं बंड झालं.. संसदेच्या अधिवेशनादरम्यान आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधीच ठाकरे गटाच्या एकूण ९ लोकसभा खासदारांपैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दीना पाटील या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाचा व्हिप झुगारून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
ठाकरे गटाचे संख्याबळ केवळ ३
हा पक्षासाठी दुसरा मोठा धक्का होता कारण संसदेत दोन-तृतीयांश बहुमत असल्यामुळे या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार तातडीने कोणतीही अपात्रतेची कारवाई करणे कायदेशीरदृष्ट्या कठीण झाले आहे. या बंडखोर खासदारांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीत ठाकरे गटाचे संख्याबळ केवळ ३ वर येऊन ठेपले आहे, ज्यात अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. हा दुसरा धक्का पचवणे ठाकरे गटाला अद्याप शक्य झाले नसतानाच, आता तिसरा आणि कदाचित सर्वाधिक खिळखिळा करणारा धक्का मुंबई महापालिकेतून बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ऑपरेशन टायगर पार्ट २
मुंबई हा शिवसेनेचा, विशेषतः ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबई महानगरपालिकेवर वर्षानुवर्षे ठाकरे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता याच मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर पार्ट २ सक्रिय झाल्याचा दावा सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि गटनेते अमेय घोले तसेच किरण लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील २० पेक्षा जास्त नगरसेवक सध्या थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि ते कोणत्याही क्षणी जाहीर प्रवेश करू शकतात.या संदर्भात पडद्यामागे अत्यंत वेगाने हालचाली सुरू असून हा आकडा ४० ते ४५ नगरसेवकांपर्यंत नेण्याचे लक्ष्य शिंदे गटाने ठेवले आहे.
स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचे एकूण ६४ नगरसेवक होते, त्यामुळे या नगरसेवकांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन करण्यासाठी आणि कायदेशीर पेच टाळण्यासाठी दोन-तृतीयांश म्हणजेच किमान ४३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिंदे गटाचे रणनीतीकार हा आकडा पूर्ण होईपर्यंत कमालीची गुप्तता पाळत आहेत. जेव्हा पुरेसे संख्याबळ एकत्र येईल, तेव्हा मुंबईत एक मोठा सोहळा आयोजित करून या सर्व नगरसेवकांचा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला जाईल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये पक्षश्रेष्ठींबद्दल प्रचंड नाराजी
केवळ मुंबईच नव्हे, तर साताऱ्यातील देखील २० ते २५ आजी- माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.या मोठ्या राजकीय पडझडीची कारणे काय आहेत, शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे आणि खासदार मिलिंद देवरा यांच्या मते, ठाकरे गटातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये पक्षश्रेष्ठींबद्दल प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय हे सामान्य कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत, लोकांचे फोन घेतले जात नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप सातत्याने केला जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
याउलट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ तास उपलब्ध असणारे नेते आहेत, ते प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटतात, त्यांच्या समस्या ऐकतात आणि तातडीने निधी मंजूर करतात. यामुळेच अनेक लोकप्रतिनिधी स्वतःहून समोरून शिंदे यांच्याकडे येऊन आपले मन मोकळे करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. असं म्हटलं जातंय…. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय नियोजनाचे कौतुक केले आहे. शिंदे साहेबांचे प्लॅनिंग एकदम करेक्ट आणि व्यवस्थित असते, त्यामुळेच आधी खासदार आले, आता त्यांच्या पाठोपाठ आमदार आणि नगरसेवक देखील येणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आमदारांच्या बाबतीत जी रणनीती आखली गेली होती, तशीच रणनीती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरसेवकांच्या बाबतीत राबवली जात आहे. यामुळे आगामी निवडणुकींच्या आधी ठाकरे गटाची ताकद पूर्णपणे कमी करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असल्याच स्पष्ट दिसत आहे.
ठाकरे गटाने संतापजनक प्रतिक्रिया
तर दुसरीकडे, ठाकरे गटाने या सर्व घडामोडींवर अत्यंत आक्रमक आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यामागे प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि सत्तेचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीपोटी तसेच कोट्यवधी रुपयांच्या अमिषाला बळी पडून हे नेते पक्ष सोडून जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. परंतु, कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या ठाकरे गटाची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ६ फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट लोकसभा अध्यक्षांनी मान्य केला आहे, त्यांनी अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण केल्यास लोकसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा महायुतीमधील महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष ठरेल.
शिंदे गटाचे वजन वाढणार
यामुळे आगामी जागावाटपात आणि मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे वजन वाढणार आहे. तसेच, जर ४० पेक्षा जास्त नगरसेवक फुटले, तर मुंबईतील प्रत्येक वॉर्ड स्तरावर ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडून पडेल. शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख देखील संभ्रमात पडले असून कार्यकर्त्यांना पक्षात रोखून धरण्याचे मोठे आव्हान सध्या मातोश्रीसमोर उभे ठाकले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पक्षांतराच्या अनेक घटना
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पक्षांतराच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, परंतु एकाच मूळ पक्षाचे आमदार, त्यानंतर खासदार आणि शेवटी स्थानिक पातळीवरील नगरसेवक अशा तीनही स्तरांवर एकापाठोपाठ एक मोठे बंड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे ठाकरे गटाला बसलेला हा ट्रिपल शॉक केवळ तात्पुरता नसून त्याचे दूरगामी परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर होणार आहेत. उद्धव ठाकरे या संकटातून आपल्या उरलेल्या पक्षाला कसे बाहेर काढतात आणि मुंबईचा आपला गड राखण्यात यशस्वी होतात का, की एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर ठाकरे गटाला पूर्णपणे निस्तानाभूत करते, हे पाहणे येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे










