Uddhav Thackeray MPs Split: उद्धव ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर राहिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या खासदारांनी पक्षापासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला आणि त्यामागे नेमकी कोणती करणे आहेत, याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना बुधवारी नवे वळण मिळाले. पक्षाच्या संसदीय बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना लोकसभेतील नऊपैकी केवळ तीन खासदार उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या सहा खासदारांबाबत विविध तर्कवितर्क सुरू असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. (Uddhav Thackeray MPs Split)
सर्व खासदारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश (Instructions issued to all MPs to attend the meeting)
पक्षाने सर्व खासदारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून संबंधित खासदारांविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पक्षाच्या भवितव्याबाबत मतभेद? (Differences of opinion regarding the party’s future)
गैरहजर खासदारांनी पक्ष सोडण्यामागे संघटनात्मक आणि राजकीय कारणे असल्याचा दावा केल्याची चर्चा आहे. पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत तसेच इतर पक्षांसोबतच्या संभाव्य समीकरणांबाबत त्यांच्यात अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याऐवजी शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका घेतल्याचे समजते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आणि अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अनुपस्थित खासदारांना नोटीसची तयारी (Move to issue notices to absent MPs)
बैठकीला गैरहजर राहिलेल्या सर्व खासदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. नोटीसला उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. यासंदर्भातील अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.
खासदारांच्या निवासस्थानांबाहेर सुरक्षा वाढवली
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेऊन काही खासदारांच्या निवासस्थानांबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने महत्वाची पावले उचलल्याचे सांगितले जात आहे.
चर्चेत असलेले सहा खासदार कोण आहेत?
संजय जाधव
संजय देशमुख
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाकचौरे
संजय दिना पाटील
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणावर कोणते राजकीय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












