Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • तारापूर MIDC मधील गॅस गळतीचा कहर, २६०० लोकांना केलं गेलं स्थलांतरित
Top News

तारापूर MIDC मधील गॅस गळतीचा कहर, २६०० लोकांना केलं गेलं स्थलांतरित

Gas leak

Gas leak : ऑगस्ट 2025 — तारापूर MIDC मधील एका औषधाच्या कारखान्यामध्ये कामाला गेलेल्या ६ कामगारांपैकी ४ कामगार हे घरी परतलेच नाहीत. रिअॅक्शन टँकमधून गॅस बाहेर पडतो. हे ६ कामगार गॅसच्या संपर्कात येतात, त्यापैकी ४ कामगारांचा मृत्यू होतो आणि २ जण गंभीर जखमी होतात. मे २०२५ — पालघरमध्ये DMS गॅस लीक होतो आणि १३ कामगार या गॅसच्या संपर्कात येऊन गंभीर जखमी होतात. या १३ कामगारांना डोळ्यांत जळजळ आणि श्वास घेण्याचा त्रास होतो, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं.

हेही वाचा – “मराठ्यांच्या १० लाख कुणबी नोंदी गेल्या कुठं?;” मनोज जरांगेचा सरकारला परखड सवाल

काही वर्षांखाली याच बोईसर MIDC मध्ये गॅस लीकमुळे पुन्हा ३ कामगारांचा मृत्यू होतो. प्रभाकर खडसे (५९), दत्तात्रय घुले (२५), रघुनाथ गोराई (२५) यांना याच गॅस गळतीमुळे आपल्या जीवाला मुकावं लागतं. फेब्रुवारी २०२६ — क्लोरीन गॅस लीक (बोईसर). 2026 मध्येच पुन्हा एकदा क्लोरीन गॅस लीक झाल्याची घटना समोर आली. एका रासायनिक कंपनीत अचानक क्लोरीन गॅस बाहेर पडला. कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला. परिसरातील काही कंपन्या सुरक्षेसाठी रिकाम्या करण्यात आल्या.

2500 लिटरच्या टँकमधून गॅस बाहेर पडला

मार्च २०२६ — बोईसरमध्ये पुन्हा गॅस लीक झाला आणि या वेळी हा गॅस फक्त कारखान्यापुरता मर्यादित नव्हता, तर हा बोईसरमध्ये राहणारे नागरिक, शाळकरी मुलं आणि तेथील कामगार या सगळ्यांच्या जीवावर बेतणारा होता. २ मार्चला 2500 लिटरच्या टँकमधून गॅस बाहेर पडला, सगळीकडे धूर झाला आणि हाच पांढरा धूर 3-5 किमी परिसरात पसरला. लोकांना काही दिसेनासं झालं. धुक्यासारखा वाटणारा हा जीवघेणा गॅस बघता बघता परिसरात पसरला आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. ३ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, 2600 लोकांना हलवावं लागलं, त्यात 1600 शाळकरी विद्यार्थी होते. ही गॅस गळतीची मालिका इथेच संपत नाही. डोळ्यावर पट्टी लावून बसलेलं प्रशासन वाट पाहत आहे अजून अशा घटना होण्याची.

शाळेतील १६०० पेक्षा जास्त मुलं शाळेतून हलवण्यात आली

रोज सकाळी उठून जर तुमची मुलं शाळेत जात असतील, तर आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक कारखान्यांपासून ते किती सुरक्षित आहेत याची खात्री कोण घेणार आहे? बोईसरमध्ये झालेल्या या घटनेमुळे तारापूर विद्यामंदिर आणि चिन्मया विद्यालय या शाळेतील १६०० पेक्षा जास्त मुलं शाळेतून हलवण्यात आली. हा गॅस इतक्या वेगाने पसरला की १००० पेक्षा जास्त कामगार, MIDC कॉलनीतील नागरिक — सगळ्यांना त्या ठिकाणावरून हलवण्यात आलं. ऑगस्ट २०२५, मे २०२५, फेब्रुवारी २०२६, मार्च २०२६ — MIDC मध्ये होणाऱ्या या सगळ्या घटनांची मालिका वाचली की आपलं प्रशासन भविष्यातील घटनांसाठी किती सज्ज आहे याचं चित्र स्पष्ट होतं. सातत्याने अशा घटना होऊनही खबरदारी घेतली जात नाही, नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातो. कधी कुठला, कोणता गॅस लीक होईल याची शाश्वती नसताना जीव मुठीत घेऊन जगणारे हे नागरिक MIDC मधल्या प्रत्येक दुसऱ्या घटनेनंतर यंत्रणेकडे आशा-अपेक्षांचं ओझं डोळ्यांत घेऊन पाहत असतात.

महिन्यांमध्येच गॅस गळतीच्या २ घटना समोर आल्या

तरीसुद्धा दुर्दैव म्हणजे या घटनांची मालिका काही थांबत नाही. २०२६ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्येच गॅस गळतीच्या २ घटना समोर आल्या. २ मार्चला जी गॅस गळती झाली, त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, NDRF टीम त्या ठिकाणी पोहोचले. बोईसरचा परिसर बंद केला. गॅस लीक थांबवण्याचं काम केलं. रसायनावर वाळू टाकून नियंत्रण केलं. मात्र ही घटना वाटते तितकी सोपी अजिबातच नाही. तारापूर MIDC मध्ये ही पहिली घटना नाही. मागील काही वर्षांत येथे अनेक वेळा गॅस लीकच्या घटना घडल्या आहेत. तारापूर MIDC हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. येथे शेकडो रासायनिक आणि औषधनिर्मिती कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये वापरली जाणारी रसायने अत्यंत धोकादायक असतात. आणि त्याच वेळी या कारखान्यांच्या अगदी जवळ लोकवस्तीही आहे. इतिहास पाहिला तर औद्योगिक निष्काळजीपणामुळे जगाने मोठ्या दुर्घटना पाहिल्या आहेत. १९८४ मधील भोपाळ गॅस दुर्घटना हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण.

काय होतंय हे समजण्याआधीच श्वास थांबला

२ डिसेंबर १९८४ ची रात्र… मध्यप्रदेशातील Bhopal शहरात सगळं नेहमीसारखं चालू होतं. लोक शांतपणे झोपले होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास Union Carbide च्या कीटकनाशक कारखान्यातून Methyl Isocyanate (MIC) नावाचा अत्यंत विषारी गॅस हवेत पसरू लागला. काही मिनिटांतच हा गॅस शहरभर पसरला… आणि लोकांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलला. रातोरात हजारो लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. डोळ्यांत तीव्र जळजळ, घशात आग, छातीत दडपण — लोक घाबरून घराबाहेर पळू लागले. काही लोक रस्त्यावरच कोसळले. काहींना काय होतंय हे समजण्याआधीच त्यांचा श्वास थांबला. या दुर्घटनेत पहिल्या काही तासांतच सुमारे ३,००० लोकांचा मृत्यू झाला. पुढील काही वर्षांत विषारी परिणामांमुळे १५,००० पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला, आणि ५ लाखांहून अधिक लोक कायमचे आजारी पडले. अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी गेली, अनेक मुलं जन्मतःच आजार घेऊन जन्माला आली. या घटनेत आग लागली नव्हती, स्फोटही झाला नव्हता — पण एक अदृश्य विषारी वायू हजारो जिवांवर तुटून पडला होता.

तेव्हा भोपाळची ती भीषण रात्र पुन्हा आठवते

आज बोईसर किंवा इतर औद्योगिक भागात गॅस लीकसारख्या घटना घडतात तेव्हा भोपाळची ती भीषण रात्र पुन्हा आठवते. कारण भोपाळने जगाला एक कठोर सत्य शिकवलं — औद्योगिक निष्काळजीपणाची किंमत सामान्य लोकांना जीव देऊन चुकवावी लागते. भोपाळची ती रात्र केवळ एक दुर्घटना नव्हती… ती हजारो कुटुंबांची उध्वस्त झालेली स्वप्नं होती. आणि म्हणूनच प्रत्येक गॅस लीकच्या बातमीसोबत एक प्रश्न आजही उभा राहतो — तो म्हणजे इतिहासातून आपण खरंच काय शिकलो आहोत का? बोईसरमधील ही घटना सुदैवाने वेळेत नियंत्रणात आली आणि मोठी जीवितहानी टळली. पण या घटनेने एक मोठा प्रश्न मात्र पुन्हा समोर आणला आहे — औद्योगिक विकासासोबत सुरक्षेची जबाबदारी किती गंभीरपणे घेतली जाते? कारण इतिहास सांगतो, छोट्या निष्काळजीपणातूनही मोठ्या दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे अशा घटना केवळ बातमी म्हणून न पाहता, त्यातून धडा घेणं आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलणार, हा मोठा प्रश्न आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts