Mohammad Amir Statement On T20 World Cup 2026 | भारतीय संघानं टी20 वर्ल्डकप 2026 (T20 World Cup 2026) च्या फायनलमध्ये दमदार अशी कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. विरूद्ध टीम न्यूझीलंडवर 96 धावांनी मात करत भारतीय संघानं टी20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. एकिकडे भारतात जल्लोषाचे वातावरण असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंमध्ये मात्र नाराजीचे वातावरण दिसत आहे.
भारतीय संघाच्या विजयावर पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूची चांगलीच झळफळाट झाली आहे. त्याला भारताचा विजय पचला नसल्याचं दिसत आहे. कारण भारताचा पराभव होईल, असं भाकीत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने केलं होतं. मात्र, त्याचं हे भाकीत भारतानं खोटं ठरवत त्याला त्याची औकात दाखवून दिली आहे.
भारत हरणार असा दावा कोणत्या पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला?
भारत हरणार असा दावा करणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून तो मोहम्मद आमिर आहे. पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजच्या ‘हसना मना हैं’ या शोमध्ये मोहम्मद आमिर, राशिद लतीफ आणि अहमद शहजाद हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात कोण विजय प्राप्त करणार? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर राशिद लतीफ आणि अहमद शहजाद यांनी भारत जिंकेल असा दावा केला. तर नाणेफेक जिंकून जरी प्रथम गोलंदाजी किंवा फलंदाजी केली तरी न्यूझीलंडच जिंकणार आणि भारत हरणार, असा दावा मोहम्मद आमिरने केला होता.
मोहम्मद आमिरने केलेल्या या दाव्यानंतर भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत, विक्रम रचत मोठा विजय प्राप्त केला. त्यानंतर मोहम्मद आमिरला भारताचा हा दणदणीत विजय पचला नाही आणि त्याने पुन्हा एकदा भारताच्या विजयावर खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताच्या विजयानंतर काय म्हणाला पाकचा क्रिकेटपटू?
भारत जिंकल्यानंतर मोहम्मद आमिरला पुन्हा एकदा त्याच्या भाकितावर प्रश्न विचारण्यात आला. भारत जिंकला आणि तुमचे भाकीत चुकीचे ठरले, यावर काय सांगाल? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर आमिर म्हणाला की, जिंकले आहे, ठीक आहे. वर्ल्डकप ते त्यांच्या घरी घेऊन जाणार आहेत, माझ्या घरी थोडीच घेऊन येणार आहेत. वेल डन…, अशी खोचक प्रतिक्रिया आमिरने दिली. आमिरच्या या प्रतिक्रियावरून त्याची झळफळाट झाल्याचं स्पष्ट दिसून आलं.
दरम्यान, भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला धूळ चारत 2026 च्या टी-20 विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघानं दमदार अशी कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे.अंतिम सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत पाच गडी गमावून 255 धावा केल्या. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघ 19 षटकांत 159 धावा करून सर्वबाद झाला. विशेष म्हणजे टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघानं सर्वाधिक धावा करत मोठा इतिहास रचला आहे.












