Jacqueline Fernandez ED Notice : तब्बल 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस (Jacqueline Fernandez) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि यावेळी कारण आहे तिचा एक मोठा निर्णय अटकेत असलेला तिचा घोटाळेबाज एक्स बाॅयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी संबंधित या प्रकरणात जॅकलिनने स्वतः माफीचा साक्षीदार (Approver) बनण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केल्याचं समजते. दिल्लीतल्या पटीयाला हाऊस कोर्टमध्ये या अर्जावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता ईडीला नोटीस बजावली आहे.
हेही वाचा – “…म्हणून रोहित शेट्टीच्या घराबाहेर केला गोळीबार”, आरोपीने दिली कबुली, सांगितलं धक्कादायक कारण
ईडीला 20 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी ईडीला नोटीस बजावली असून, 20 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश ईडीला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता २० एप्रिलला होईल. तिला या तपासाच्या संदर्भात ईडीने अनेक वेळा समन्स बजावले होते. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पहिल्यांदाच आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ३ जुलै रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणातील ईडीचा तपास अहवाल रद्द करण्याची तिची याचिका फेटाळून लावली होती. दोन महिन्यांनंतर, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
जॅकलिनने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले
या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर हा फक्त एक साधी कायदेशीर प्रक्रीया नाही, तर संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकणारा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण ‘माफीचा साक्षीदार’ म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःच्या भूमिकेबाबत माहिती देऊन तपास यंत्रणेला सहकार्य करतो आणि बदल्यात त्याला काही प्रमाणात कायदेशीर संरक्षण मिळवू शकतं. आतापर्यंत जॅकलिनने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले होते, पण आता अचानक तिने घेतलेली ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करते. तिला नक्की काय माहिती आहे, आणि ती आता का बोलण्यास तयार झाली आहे? असे अनेक प्रश्न आहेत.
जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर रणबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग यांच्या पत्नीची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे आणि तपासादरम्यान त्याचे बॉलिवूडशी संबंध उघड झाले होते. त्यातच जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आल्यानंतर ईडीने तिची चौकशी केली होती आणि तिच्या भूमिकेचा तपास सुरू झाला. आता जर जॅकलिन माफीची साक्षीदार बनली, तर ती या प्रकरणातील अनेक गोष्टी उघड करू शकते, ज्यामुळे सुकेशविरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
जॅकलिन फर्नांडिसवर कायदेशीर दबाव वाढू शकतो
पण दुसरीकडे, हा निर्णय तिच्यासाठी रिस्क फॅक्टरही ठरू शकतो, कारण जर ईडीने तिच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही, तर तिच्यावर कायदेशीर दबाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ईडी काय निर्णय घेणार? जर त्यांनी होकार दिला, तर ही केस पूर्णपणे वेगळ्या दिशेने जाऊ शकतो, आणि जर नकार दिला, तर जॅकलिनच्या अडचणी अधिक वाढू शकतात.
सध्या देशभरात या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष दिलं जात आहे, कारण यात पैसा, पॉवर आणि बॉलिवूडचा ग्लॅमर एकत्र आलेला आहे. आता 20 एप्रिलला ईडी काय उत्तर देते, यावरच या प्रकरणाचा पुढचा अध्याय ठरणार आहे, आणि तेव्हाच कळेल की जॅकलिनचा हा निर्णय तिला वाचवणार आहे की आणखी मोठ्या संकटात ढकलणार आहे.












