Rohit Shetty | मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. तर या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या टास्कफोर्सच्या मदतीने उत्तरप्रदेशमधील आग्रा येथून प्रदिपकुमार रामसिंग उर्फ छोटू याला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा – “उद्धव ठाकरे अन् एकनाश शिंदे एकाच ताटात जेवतात…”, बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
रोहित शेट्टीच्या घराबाहेर आरोपींनी का केला गोळीबार?
पोलिसांच्या तपासात नुकतीच मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी भरमसाठ पैशांची ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये प्रदीपकुमारचा देखील समावेश होता. तर प्रदीपकुमारचा सहभाग निश्चित झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. मागील चार महिने प्रदीप कुमार फरार होता, तर आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात प्रदीपच्या अटकेनंतर आरोपींच्या अटकेची संख्या आता 9 झाली आहे. तर पोलीस आता प्रदीपकुमारची कसून चौकशी करत आहेत. तर पोलीस प्रदीपच्या माध्यमातून या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकरबाबत चौकशी करत आहेत. तर आता पोलीस मुख्य आरोपी शुभम लोणकरचा शोध घेत आहेत.
रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानाबाहेर 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री आरोपीने गोळीबार केला होता. तर चित्रपटसृष्टीत आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी हा गोळीबार केला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तर मुख्य आरोपी शुभम लोणकरच्या गँगच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.












