Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण बॉलीवूड हादरलं आहे. पण या गोळीबाराची स्क्रिप्ट कुठे लिहिली गेली? ज्यांनी गोळ्या झाडल्या ते कोण होते? जेव्हा मुंबई पोलिसांनी या तपासाची चक्रं फिरवली, तेव्हा जे सत्य समोर आलं, ते थक्क करणारं होतं. ज्याने मुंबईत टायगरचा गेम करण्याची पूर्ण रेकी केली, तो दुसरा तिसरा कोणी नसून मुंबईच्याच रस्त्यांवर प्रवाशांची ने-आण करणारा एक रॅपिडो बाईक चालक निघाला.. अंधाऱ्या गल्ल्यांमधून फिरणारा एक साधा बाईक टॅक्सी चालक थेट बिश्नोई गँगचा हस्तक कसा बनला पाहूयात…..
तपासात रॅपिडो चालकाचं नाव कसं समोर आलं? ( Rapido Driver Arrest )
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा पहिला सुगावा लागला तो हल्लेखोरांनी सोडलेल्या पल्सर दुचाकीवरून. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ एक पल्सर बेवारस सोडण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज खंगाळले गेले. त्या फुटेजमध्ये दिसला २२ वर्षांचा एक तरुण, नाव ऋतिक कुमार उर्फ रोशन. मूळचा बिहारचा असलेला हा ऋतिक गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागात राहत होता. उदरनिर्वाहासाठी तो रॅपिडोवर बाईक चालवायचा. रॅपिडो चालवत असतानाच त्याने जुहू, अंधेरी आणि टायगर श्रॉफच्या घराची, त्याच्या गाड्यांच्या वेळांची अचूक रेकी केली होती अशी माहितीये. मुंबईची कोणती गल्ली कुठे निघते, कुठे पोलीस नसतात आणि गुन्ह्यानंतर कुठे पळून जाता येईल, याचा संपूर्ण मॅप ऋतिकच्या डोक्यात तयार होता.
पण प्रश्न असा होता की, ऋतिक हा फक्त रेकी करत होता, मग गोळ्या कोणी झाडल्या? मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेव्हा तांत्रिक विश्लेषण केलं, तेव्हा दोन नवीन नावं समोर आली. ही नावं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण टायगर श्रॉफ सारख्या मोठ्या स्टारवर थेट गोळ्या झाडणारे सराईत गुंड नव्हते, तर ती होती दोन कोवळी पोरं….
कोटा रेल्वे स्थानकावर तिघांना पकडलं ( Tiger Shroff Firing Case )
हरियाणाच्या सोनिपतचे राहणारे दोन तरुण. एक १८ वर्षांचा रेहान आणि दुसरा अवघा १७ वर्षांचा एक तरुण…. गुन्हा घडला होता. मुंबई पोलीस अलर्टवर होते. हल्लेखोर पळाले होते, पण कुठे? त्यांनी पळण्यासाठी वापरली ट्रेन. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि सायबर सेल रात्रभर जागून मोबाईल टॉवर लोकेशन ट्रॅक करत होते. हल्ला केल्यानंतर अवघ्या 12 मिनिटांत हे तिघे अंधेरीला पोहोचले. काल रविवार असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे हे तिघेजण 7.12 च्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकात पोहोचले. तिथून या हल्लेखोरांनी लोकल ट्रेन पकडली आणि ते वसईला गेले. रात्री 10 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पुणे-जयपूर ही ट्रेन वसई स्थानकात आली. या गाडीत हे तिघेजण बसले. आज सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी ही ट्रेन राजस्थानच्या कोटा स्थानकात पोहोचली. याठिकाणी कोटा पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले.
कोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात पकडलेल्या तीन संशयितांचा संबंध अनिल पंडित ( Anil Pandit ) या गुंडाशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनिल पंडित हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी सोशल मीडिया पोस्ट अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्या नावाने समोर आली होती. अनिल पंडितला अमेरिकेतून कार्यरत असलेल्या हॅरी बॉक्सर उर्फ हरीचंद जाट याच्याकडून सूचना मिळत असल्याचा संशय आहे.
गुन्ह्यात अल्पवयीन संशयिताचा कथित सहभाग ( Lawrence Bishnoi Gang )
लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक अजेंडा आहे, बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करणे. सलमान खाननंतर आता त्यांनी टायगर श्रॉफला टार्गेट केलं. या गँगचा पॅटर्न भयंकर आहे, गरजू तरुणांना पैशांचं आमिष दाखवून गुन्हेगारीकडे वळवण, कोवळ्या पोरांना गोळीबारासाठी पाठवणं, कारण कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा होत नाही आणि ते लवकर जामिनावर बाहेर येतात. रिल्स आणि गँगस्टर संस्कृती दाखवून या पोरांचा वापर केला जातो.
कोटा पोलिसांच्या तत्परतेमुळे हे तिघेही अवघ्या २४ तासांत गजाआड झाले आहेत. पण विचार करा, आपल्या अवतीभवती फिरणारा एखादा रॅपिडो चालक किंवा डिलिव्हरी बॉय एखाद्या गँगचा स्लीपर सेल असू शकतो? आणि सोशल मीडियाच्या गर्तेत अडकलेली आपली कोवळी पोरं उद्याचे सराईत गुन्हेगार बनत आहेत का? टायगर श्रॉफ या हल्ल्यातून वाचला, पण या घटनेने मुंबईच्या सुरक्षेवर आणि आपल्या तरुणाईच्या भविष्यावर अनेक धारदार प्रश्न उपस्थित केले आहेत.









