Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक कुंभमेळ्याला कधी जायचं? अमृतस्नानाच्या तारखा, मुक्काम आणि जेवणाची माहिती एका क्लिकवर!
महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक कुंभमेळ्याला कधी जायचं? अमृतस्नानाच्या तारखा, मुक्काम आणि जेवणाची माहिती एका क्लिकवर!

Nashik Kumbh Mela 2027
2
Nashik Kumbh Mela 2027 :  तब्बल बारा वर्षांची प्रतीक्षा. लाखो भाविकांची उत्सुकता.  साधू-संतांची मांदियाळी आणि गोदावरीच्या तीरावर रंगणारा भक्तीचा महासंगम. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज धर्मध्वजारोहण झालं असून सिंहस्थ कुंभमेळ्याला अधिकृत सुरुवात झाली आहे. मात्र, ध्वजारोहण झालं म्हणजे कुंभमेळा सुरू झालाय का? भाविकांनी नाशिकला नेमकं कधी जायचं?
साधू-महंतांची गर्दी कधी पाहायला मिळणार? अमृतस्नानान कधी करता येणार आहे? सरकारकडून मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असणार का? असे अनेक प्रश्न भाविकांना पडले असतील. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Nashik Kumbh Mela 2026-28)

धर्मध्वजारोहण झालं म्हणजे कुंभमेळा सुरू झाला का?

सर्वात आधी समजून घेऊया, धर्मध्वजारोहण झालं म्हणजे कुंभमेळा सुरू झाला का? तर याचं उत्तर होय असं आहे. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या रामकुंडावर, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहण करण्यात आलं. यासोबतच सिंहस्थ पर्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आता काही भाविक नाशिकमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. सध्या गर्दी नसल्याने भाविक त्र्यंबकेश्वर येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. तुम्हालाही भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये देवदर्शनासाठी जाऊ शकता.

नागा साधू आणि आखाड्यांचं वैभव कधी पाहायला मिळणार?

मात्र तुम्हाला जर या कुंभमेळ्यात नागा साधूंचं दर्शन घ्यायचं असेल, विविध आखाड्यांच्या मिरवणुका, साधू-महंतांचा लवाजमा आणि गोदावरीच्या घाटांवर उसळणारा भक्तीचा महासागर अनुभवायचा असेल, तर जुलै ते सप्टेंबर 2027 या कालावधीत हे चित्र पाहायला मिळू शकतं. (Ramkund Nashik)

कारण सध्या जरी या कुंभमेळ्याला औपचारिक सुरुवात झाली असली, तरी 24 जुलै 2027 रोजी साधुग्राममध्ये आखाड्यांचं ध्वजारोहण, तर 29 जुलैला नगरप्रदक्षिणा नियोजित आहे. त्यानंतर 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं अमृतस्नान, 31 ऑगस्टला दुसरं अमृतस्नान पार पडणार आहे. तर तिसरं अमृतस्नान नाशिकमध्ये 11 सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 12 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे. याच प्रमुख पर्वण्यांच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

GFX : अमृतस्नानाच्या महत्त्वाच्या तारखा

  • 2 ऑगस्ट 2027 : पहिलं अमृतस्नान
  • 31 ऑगस्ट 2027 : दुसरं अमृतस्नान
  • 11 सप्टेंबर 2027 : नाशिकमध्ये तिसरं अमृतस्नान
  • 12 सप्टेंबर 2027 : त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृतस्नान

अमृतस्नान सुरू झाल्यावरच कुंभमेळा सुरू होणार का?

पण इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अमृतस्नान सुरू झाल्यावरच अधिकृत कुंभमेळा सुरू होणार का? तर तसं अजिबात नाही. धर्मध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वाचा औपचारिक शुभारंभ आधीच झाला आहे. अमृतस्नान हा या संपूर्ण कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची सुरुवात आणि अमृतस्नानाची सुरुवात या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. (Nashik Kumbh Mela Food Facilitie)

पहिल्या अमृतस्नानाला सामान्य भाविकांना स्नान करता येणार का?

पहिल्या अमृतस्नानासाठी कुंभमेळ्यात मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पहिल्या अमृतस्नानाला सर्वसामान्य भाविकांना गोदावरीत स्नान करता येणार का? असा प्रश्न अनेक भाविकांना पडला आहे.

तर अमृतस्नानाच्या दिवशी पहाटेपासूनचा पहिला मुख्य वेळ हा विविध १३ आखाड्यांच्या साधू, महंत आणि नागा साधूंच्या पवित्र स्नानासाठी राखीव असतो. या काळात सामान्य भाविकांना मुख्य घाटावर प्रवेश नसतो. मात्र, साधूंचे स्नान पूर्ण होताच, प्रशासनाकडून घाट सुरक्षित करून दुपारी सामान्य भाविकांसाठी खुले केले जातात, अशी माहिती आहे. त्यामुळे पहिल्या स्नानाच्या दिवशीच सर्वसामान्य जनतेलाही पवित्र स्नान करण्याची पूर्ण संधी मिळते, फक्त त्यासाठी साधूंचे स्नान पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागते. (Kumbh Mela Accommodation)

हेही वाचा : Kumbh Mela 2026 : भारतात कुंभमेळा कुठे भरतो? प्रयागराज ते नाशिक, जाणून घ्या चार पवित्र कुंभक्षेत्रांचे धार्मिक महत्त्व

सिंहस्थ कुंभमेळा किती दिवस चालणार?

हा कुंभमेळा नेमका किती दिवस चालणार आहे? तर 31 ऑक्टोबर 2026 पासून जुलै 2028 पर्यंत, म्हणजेच जवळपास 21 महिने सिंहस्थ पर्व चालणार आहे. हा कुंभमेळा 21 महिने चालल्यानंतर 24 जुलै 2028 रोजी या पर्वाची सांगता होणार असल्याची माहिती आहे. (Trimbakeshwar Kumbh Mela)

या काळात धार्मिक विधी, आखाड्यांचे कार्यक्रम, साधू-संतांची उपस्थिती आणि विविध धार्मिक सोहळ्यांमुळे नाशिकनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशातील 13 प्रमुख आखाड्यांचा सहभाग अपेक्षित आहे. शैव, वैष्णव आणि उदासीन परंपरांतील साधू-महंत या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाच्या अंदाजानुसार संपूर्ण पर्वकाळात सुमारे 12 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.

भाविकांसाठी राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था असणार का?

आता भाविकांना महत्त्वाचा एक प्रश्न पडला असेल की, कुंभमेळ्यासाठी जायचं आहे, पण त्याठिकाणी कोणत्या कोणत्या सुविधा असणार आहेत? तिथे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी शासनाकडून फ्रीमध्ये काही सुविधा आहेत का? तर याचं उत्तर आहे हो. (Nashik Kumbh Mela Amrit Snan Dates)

या ऐतिहासिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सुविधांसाठी सुमारे 22 हजार 425 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रस्ते, पार्किंग, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, आरोग्यसेवा, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेचा समावेश आहे. साधू-महंतांसाठी स्वतंत्र साधुग्राम उभारण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे.

भाविकांसाठी शहराबाहेर भव्य ‘टेंट सिटी’ उभारण्यात येत आहेत. त्यासोबतच २४ तास पिण्याचे पाणी, मोबाईल स्वच्छतागृहे, वैद्यकीय केंद्रे आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. सरकारकडून मूलभूत निवारे मोफत पुरवले जात असले, तरी मोफत राहण्याची आणि २४ तास चालणाऱ्या भंडाऱ्यांची मुख्य व्यवस्था विविध धार्मिक संस्था, आखाडे आणि सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते. कुंभमेळ्यात येणाऱ्या कोणत्याही भाविकाला उपाशी राहावे लागणार नाही, अशी चोख अन्नछत्रांची व्यवस्था यादरम्यान असते. म्हणजे तुम्ही या कुंभमेळ्यात फ्रीमध्ये राहू शकता आणि जेवण देखील करू शकता. (Nashik Kumbh Mela 2027)

भाविकांनी नाशिकला कधी जावं?

एकंदरीत, धर्मध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ झाला असला, तरी या सोहळ्याचं खरं वैभव ऑगस्ट 2027 पासून होणाऱ्या अमृतस्नानाच्या पर्वण्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. लाखो भाविक, साधू-संतांचे आखाडे, धार्मिक मिरवणुका आणि गोदावरीच्या तीरावर रंगणारा श्रद्धेचा महासंगम. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातील भाविक उत्सुक आहेत. त्यामुळे तुम्हीही नाशिक कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करत असाल, तर अधिकृत वेळापत्रक आणि प्रशासनाच्या सूचनांनुसारच प्रवासाचं नियोजन करावं. (Kushavarta Tirtha)

हेही वाचा :  Kumbh Mela 2026 : ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण; भक्ती, परंपरा आणि गोदावरीच्या पवित्र स्नानपर्वाची सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts