Ravikant Tupekar | नुकतंच राजकीय नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोघं एकाच ताटात जेवतात, असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. तसेच राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी कितीही भाडत असले तरी शेवटी एकाच ताटात जेवतात, असं विधान तुपकर यांनी केलं आहे.
हेही वाचा – पाकिस्तान हादरला! गॅस पाइपालाइनचा भीषण स्फोट, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
रविकांत तुपकर नेमकं काय म्हणाले?
वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावातील शेतकऱ्यांनी विनाअट सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र, प्रशासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्याने शेतकरी सतीश इढोळे यांनी 11 एप्रिलपासून आमरण उपोषण करण्यास सुरूवात केली आहे. तर बुधवारी (15 एप्रिल) रविकांत तुपकर यांनी या आंदोलनाला भेट देत शेतकरी सतीश इढोळे यांचं आमरण उपोषण सोडवलं. तसेच तुपकर यांनी तेथील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर सरकारने या मागण्या मान्य केल्या माही तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. यादरम्यान बोलताना तुपकरांनी एकनाश शिंदे आणि उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक वक्तव्य केलं.
रविकांत तुपकर म्हणाले की, सर्वांच्या संघटना असतात, यामध्ये पोलीस पाटलांची संघटना, ग्रामसेवकांची संघटना, आशा सेवकांची संघटना आणि वेगवेगळ्या पक्षातून निवडून येणारे संरपंच त्यांचीही एक संघटना आहे. तसेच मी तर वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांना मुंबईत एका ताटात काला करून खाताना जवळून पाहिलं आहे, असं वक्तव्य तुपकर यांनी केलं.
पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांशी कितीही भांडत असले तरी ते दिल्लीत एकाच ताटात काला करून खातात. त्या दोघांमध्ये कितीही वाद असला तरी ते एका ताटात जेवतात. एकाची बियर आणि दुसऱ्याचा चकणा, पाहिलं आहे मी मागच्या आठवड्यात. मग तुम्हाला जेवायला गेलेलं चालतं पण आम्हाला शेजारच्या घरी गेलेलं चालत नाही का? असा खोचक सवालही रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, तुपकर यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.












