West Bengal Election 2026 | काल (23 एप्रिल) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections) पहिल्या टप्प्यात 152 जागांवर विक्रमी मतदान झाले. निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 294 सदस्यीय बंगाल (Bengal) विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 92.88 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कूचबिहार जिल्ह्यात झाले तर त्याखालोखाल दक्षिण दिनाजपूरमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे.
हेही वाचा – मी झालमुरी खाल्ली पण मिरची TMCला लागली…, पंतप्रधान मोदींचा खोचक टोला, पश्चिम बंगालमध्ये केला उपरोधिक हल्ला
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, सर्वाधिक मतदान कुठे झाले?
मुर्शिदाबाद, बांकुरा आणि कूचबिहारमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे 90 टक्क्यांहून अधिक होती. तसेत मालदा, झाडग्राम आणि पश्चिम मेदिनीपूरमध्येही जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. तर कालिम्पोंगमध्ये तुलनेने कमी मतदान झाले आहे. तिथे सुमारे 81 टक्के मतदान झाले. गुरुवारी झालेल्या मतदानाच्या या पहिल्या टप्प्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती. महिलांचे मतदान 92.69 टक्के होते तर पुरुषांचे मतदान 90.92 टक्के होते. तसेच तृतीयपंथी मतदारांचे प्रमाणही 56.79 टक्के होते.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, “स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगालमध्ये नोंदवलेले हे सर्वाधिक मतदान आहे. आकडेवारीनुसार, राज्यातील यापूर्वीचे सर्वाधिक मतदान 2011 च्या विधानसभा निवडणुकीत 84.72 टक्के झाले होते.”
पश्मिच बंगालमध्ये आता मदतादानाचा पहिला टप्पा पार पडला असून मतदानाचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तसेच मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदानोत्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, मतदान संपल्यानंतर पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांची आणि व्हिडिओ डेटाची हाताळणी करण्यासाठी कठोर नियमावली निश्चित केली आहे.
काल मतदानादरम्यान हिंसाचार, धमक्या आणि मतदारांवर हल्ल्याच्या तुरळक घटना घडल्या. तसेच आसनसोल, मालदा, कूचबिहार, सिलीगुडी आणि मुर्शिदाबाद येथून संघर्षाच्या घटना समोर आल्या. काही ठिकाणी उमेदवारांना घेरण्यात आले, त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. तर इतर ठिकाणी काठ्या, विटा आणि दगडांचाही वापर करण्यात आला.











