PM Narendra Modi On TMC | पश्चिम बंगालमधील (West Bengal) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराने जोर धरला आहे. कृष्णनगर येथील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, बंगालमधील वातावरण आता बदलत आहे. जिथे जिथे मतदानाचे प्रमाण जास्त होते तिथे भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. तसेच आपला मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल मी बंगालच्या मतदारांचे आभार व्यक्त करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही भाजप-एनडीएचा विजयाचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकवलाच पाहिजे. 4 मे रोजी बंगालमध्ये मिठाई आणि झालमुरी वाटून भाजपचा विजय साजरा केला जाईल. झालमुरीमुळे काही लोकांना मोठा धक्काही बसला आहे. मी झालमुरी खाल्ली पण टीएमसीला मिरची लागली आणि मोठा फटका बसला आहे, असा खोचक टोला पंतप्रधान मोदींनी टीएमसीला लगावला.
पुढे ते म्हणाले की, आज बंगालची जनता तृणमूलच्या जंगलराजविरोधात प्रत्येक गल्लीबोळात आणि वस्तीत आवाज उठवत आहे. ही निवडणूक ना मोदी लढवत आहेत, ना माझे सहकारी. यावेळी बंगालची जनता निवडणूक लढवत आहे. निवडणुकीचे नेतृत्व बंगालच्या जनतेच्या हातात आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे लोक एकच गोष्ट सांगत आहे आता पुरे झाले.
15 वर्षांनंतर हे स्पष्टपणे दिसत आहे की, शेतकरी शेतापासून ते बाजारापर्यंत भीतीमुक्त होण्यासाठी मतदान करत आहेत. बंगालमधील सरकारी कर्मचारी टीएमसीपासून मुक्त होण्यासाठी मतदान करत आहेत. बंगालमधील डॉक्टर भीतीमुक्त, अधिक चांगल्या व्यवस्थेसाठी मतदान करत आहेत. येथील वकील खऱ्या न्यायासाठी मतदान करत आहेत आणि शिक्षक भीतीमुक्त शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी मतदान करत आहेत. दुकानदार, रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक टीएमसी सिंडिकेटपासून स्वातंत्र्यासाठी मतदान करत आहेत. आणि बंगालचे पोलीससुद्धा गुंडांचे आदेश घेण्याऐवजी जनतेची सेवा करण्यासाठी मतदान करत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
टीएमसीवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, टीएमसीचे क्रूर शासन खोटेपणा आणि फसवणुकीने ग्रासलेले आहे. त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात दिलेले प्रत्येक आश्वासन अपूर्ण राहिले आहे. शहराची अवस्था खूपच वाईट आहे, सर्वत्र समस्या आहेत. मी निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी बंगालमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीचा सन्मान प्रस्थापित केला आहे. मी येथील सरकारी कर्मचाऱ्यांचेही कौतुक करतो. मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाचे प्रमाण मागील सर्व विक्रम मोडत आहे, असा दावाही पंतप्रधान मोदींनी केला आहे.












