Prajakt Tanpure BJP Entry : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सत्तेतील पक्ष विरोधकांचे नेते आपल्या गळाला लावण्याची खेळी खेळत आहेत. अशातच भाजपने शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का दिला आरहे. उत्तर नगर जिल्ह्यात वजनदार असणारे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची भाजप प्रवेशाची (Joining the BJP) तारीख ठरली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच महायुती या निवडणुकीसाठी मोठी मोर्चेबांधणी आणि राजकीय रणनीती आखली जात आहे. त्यातच काही दिवसांपासून चर्चा सुरु होती कि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रजाक्त तनपुरे हे भाजपात जाणार त्या चर्चांना आता अधिकच वेग आला आहे. येत्या ३० मे रोजी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद उमेदवारी भाजपकडून बहल केली जाणार आहे.
सत्यजित कदम उमेदवारीसाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार
एका बाजूला हे सर्व घडत असताना भाजपमधील निष्ठावंत देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे सुद्धा नगर विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. 2009 मध्ये पक्षाच्या सांगण्यावरून चंद्रशेखर कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. पुढे 2014, 2019, 2024 मध्येही त्यांनी पक्षाचा आदेश जुमानत इतरांना संधी दिली. मात्र, आता त्यांचे चिरंजीव सत्यजित कदम हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आमचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच संधी देईल अशी प्रतिक्रिया देत सत्यजित कदम यांनी पक्षावरील विश्वास कायम ठेवला आहे.
भाजप कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत राहणार?
प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला, आणि जर भाजपने प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली तर सत्यजित कदम हे उमेदवारी अर्ज दाखल करणार का? स्थानिक भाजप कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत राहणार की, आयात उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना साथ देणार? याची चर्चा आतापासूनच राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे.












