Rajasthan Extreme Weather : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा एक अत्यंत विदारक, भीतीदायक देखावा पाहायला मिळाला. चुरू आणि श्री गंगानगर या जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या वाळूच्या प्रचंड वादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले. भरदुपारी आलेल्या या वादळामुळे काही मिनिटांतच आकाशात अंधाराचे साम्राज्य पसरले आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे काही काळासाठी संपूर्ण यंत्रणा स्तब्ध झाली होती.
नेहमीप्रमाणे कडक उन्हाचा सामना करणाऱ्या चुरू आणि श्री गंगानगरमध्ये दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हवामानाने अचानक कूस बदलली. अचानक सुटलेल्या वेगवान वाऱ्यासोबत धूळ आणि वाळूचा एक थर आकाशात उसळला. बघता बघता वाळूची एक महाकाय भिंत हवेत उभी राहिली, जिने संपूर्ण सूर्याला आपल्या कचाट्यात घेतले.
भरदुपारी आकाशात रात्रीसारखा गडद अंधार पसरला
हे धुळीचे वादळ इतके दाट होते की, भरदुपारी आकाशात रात्रीसारखा गडद अंधार पसरला. यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता जवळजवळ शून्यावर आली. अचानक पसरलेल्या या काळोखामुळे महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांवर धावणारी वाहने जागीच थांबली. चालकांना समोरील काही मीटर अंतराचेही दिसत नसल्याने, अपघात टाळण्यासाठी सर्वांना आपल्या वाहनांचे हेडलाइट्स चालू करावे लागले. अनेक वाहनधारकांनी वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करावाी लागली.
महाकाय भिंत सुमारे 30मिनिटे आकाशात पुढे सरकत धुमाकूळ
हवामान विभाग आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाळूचे वादळ सामान्य नव्हते, तर ते अत्यंत तीव्र स्वरूपाचे होते. वादळादरम्यान वाऱ्याचा वेग अंदाजे ताशी 70किलोमीटर इतका नोंदवला गेला. वाळू आणि मातीची ही महाकाय भिंत सुमारे 30मिनिटे आकाशात पुढे सरकत धुमाकूळ घालत होती. या 30मिनिटांच्या तांडवामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाळू घरांमध्ये आणि डोळ्यांत जाऊ नये म्हणून लोकांनी तातडीने आपली दारे आणि खिडक्या बंद करून घरांमध्ये लपून राहणे पसंत केले. बाजारात असलेल्या व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांचीही यामुळे मोठी पळापळ झाली.
वादळानंतर निसर्गाने लगेचच आपले दुसरे रूप दाखवले
निसर्गाचा हा खेळ एवढ्यावरच थांबला नाही. वाळूच्या या भयानक वादळानंतर निसर्गाने लगेचच आपले दुसरे रूप दाखवले. वादळाचा वेग ओसरून धूळ खाली बसताच, आकाशात काळेभोर ढग दाटून आले. चुरू आणि श्री गंगानगरच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते जोरदार पाऊस सुरू झाला. या वादळ आणि पावसाच्या एकत्रित परिणामामुळे गेल्या काही दिवसांपासून होरपळणाऱ्या राजस्थानला मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांत येथील पारा 45°C च्या पार गेला होता, ज्यामुळे नागरिक तीव्र उष्णतेचा सामना करत होते.
पावसामुळे तापमानात अचानक 8°C ची मोठी घट
मात्र, या पावसामुळे तापमानात अचानक 8°C ची मोठी घट झाली. तापमान घसरल्याने स्थानिक रहिवाशांना असह्य उष्णता आणि दमटपणापासून तात्काळ आणि मोठा दिलासा मिळाला. वातावरणामध्ये अचानक गारवा निर्माण झाला.एकीकडे राजस्थानमधील या वादळी पावसामुळे वातावरणात बदल झाला असतानाच, हवामान विभागाने देशातील मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील 7 दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षीचा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा कमकुवत राहण्याची शक्यता आहे.










