INDIA Alliance meeting controversy : देशातील लोकसभा निवडणुकांना आणखीन तीन वर्षाचा आवधी आहे. मात्र, त्यासाठी देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी आणि पूर्वतयारी सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदी सरकारला प्रखर विरोध करणारी इंडिया आघाडी देखील लोकसभा निवडणुकींच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातंय याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीची बैठक होण्यापूर्वीच नेत्यांमधील आणि त्यांच्या विचारातील विसंगती समोर आली आहे. यामुळे आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाची पुन्हा एकदा जुनी मागणी नव्याने पुढे आली आहे. त्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काळात याच कारणावरून आघाडीत बिघाडी तर होणार नाही, अशी चिंता समर्थकांना लागली आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीत मोठ्या घडामोठी, ‘त्या’ निर्णयानंतर प्रफुल पटेल भुजबळांच्या भेटीला
उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिसीद्वारे ‘या’ बैठकीला उपस्थित राहणार
ठाकरे गटाचे आक्रमक नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या चर्चेला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या आगामी महत्त्वाच्या बैठकीबाबत बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली असून, उद्धव ठाकरे मुंबईतून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील विद्यमान सरकार हटवणे हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचं, संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मात्र, याच वेळी त्यांनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काळात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा एकदा यानिमित्ताने उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंतप्रधानपदाचा चेहरा निश्चित करूनच लोकांसमोर गेले पाहिजे
उद्धव ठाकरे यांची पहिल्यापासूनच एक ठाम भूमिका राहिली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आपण पंतप्रधानपदासाठी एक चेहरा जनतेसमोर आणायला हवा. महाविकास आघाडीच्या वेळी चेहरा जाहीर करायला उशीर झाला, ज्याचा फटका आपल्याला बसला. २०२४ मध्येही आमची हीच भूमिका होती आणि आता आगामी निवडणुकांना सामोरे जातानाही आपण पंतप्रधानपदाचा चेहरा निश्चित करूनच लोकांसमोर गेले पाहिजे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
‘इंडिया’ आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी पुढे जात आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जीचा पुढाकार आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी लावलेला तगादा यामुळे काँग्रेस बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे. आता इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? यावरून घटकापक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांना अद्याप ३ वर्ष जरी बाकी असले तरी, इंडिया आघाडीतील विसंगती आतापासूनच समोर येताना दिसून येत आहे.












