Meta Layoff : बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या अफवांनंतर, अखेर मेटानं आता मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची योजना असल्याचं निश्चित केलं आहे. मेटा आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे. कंपनी येत्या काही दिवसांत आपल्या बहुतेक कामांचं ऑटोमेशन करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
हेही वाचा : दोन-तृतीयांश खासदारांसह राघव चड्ढांनी गंभीर आरोप सोडला आम आदमी पक्ष;
किती कर्मचाऱ्यांना काढणार कामावरुन :
ब्लूमबर्गच्या एका अहवालात एक मेमो उघड झाला आहे. या अहवालानुसार, मेटाच्या चीफ पीपल ऑफिसर, जनेला गॅले यांच्या कार्यालयातून कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवण्यात आला होता. या संदेशात म्हटलं आहे की, कंपनी अंतर्गत बदलांवर काम करत आहे, ज्यामुळे हे बदल 20 मे च्या सुमारास दिसून येतील. कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आखत आहे. यापूर्वीच्या अहवालांमध्येही असं म्हटलं गेलं होतं की, मेटा 20 मे रोजी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची तयारी करत आहे, ज्यामध्ये अंदाजे 8000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाईल.
अनेक काम होणार ऑटोमेट :
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग एआय (AI) संदर्भात महत्त्वपूर्ण योजना आखत आहेत. येत्या काही दिवसांत, ते आपली अनेक कामं ऑटोमेट करतील. अहवालानुसार, या कर्मचारी कपातीचा परिणाम केवळ मेटाच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, पूर्वी भरण्याची योजना आखलेली 6000 रिक्त पदं ती भरणार नाही.
ही माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं अवघड :
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे की, ही माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे अवघड आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कर्मचारी कपातीची माहिती आधीच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळं ही माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. लीक झालेल्या अहवालानुसार, मेटाची कर्मचारी कपात केवळ 8000 कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित राहणार नाही. येत्या काही दिवसांत आणखी लोकांना कामावरून कमी केले जाईल.





