Mumbai BEST Bus Accident : मुंबई दादर पश्चिमेकडील प्लाझा सिनेमा सर्कल आणि वीर कोतवाल उद्यान परिसरातील रस्ते नोकरदार वर्ग, कुणी मुंबई फिरायला आलेलं, आणि वाहनांच्या अफाट गर्दीने फुलून परिसरातील रस्ते फुलून गेले होते. सकाळचे साडे नऊ वाजले होते. यादरम्यान 463 क्रमांकाची एक बेस्ट बस धारावीकडून दादरकडे येत होती. बेस्ट बस प्लाझा सिनेमाजवळून जात असताना चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं अत्यंत भरधाव वेगात बस प्लाझा सर्कलच्या दिशेने आली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती वेगात येणारी बस रस्त्यावरील वाहनांना आणि रस्त्यावरील चालणाऱ्या लोकांना चिरडत पुढे गेली. तिने सुरुवातीला दोन कार, एक टॅक्सी आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दोन निष्पाप नागरिकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर बसचा कंडक्टर, दुचाकीस्वार आणि अनेक नागरिकांसह तब्बल बारापेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज आणि जखमींचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. वाहनांचा चक्काचूर झाला होता आणि रस्ता रक्ताने माखला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सायन रुग्णालयात दाखल केले आणि अपघातग्रस्त चालकाला ताब्यात घेतले.
खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचे अनेक जीवघेणे अपघात
दादरची ही भयंकर घटना पहिली घटना नाही, तर मागील एका वर्षात मुंबईच्या विविध भागात बेस्ट बसचे, विशेषतः खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचे अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. या घटनेच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी मालाड पूर्व येथे एका बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टॅक्सीला आणि इतर वाहनांना अशीच भीषण धडक दिली होती. ज्यामध्ये एका टॅक्सी चालकाला आपला नाहक जीव गमवावा लागला होता. त्यापूर्वी म्हणजेच पाच महिन्यांपूर्वीच भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रात्रीच्या वेळी एका बस चालकाने नियंत्रण गमावून बस थेट मागे उभ्या असलेल्या प्रवाशांवर चढवली होती. ज्यामध्ये तीन महिलांसह चार निष्पाप नागरिकांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता आणि नऊ जण गंभीर जखमी झाले होते.
मद्यधुंद बेस्ट चालकाने बस अंगावर घालून ३० ते ४० वाहनांना उडवले
याहूनही भयानक घटना कुर्ला रेल्वे स्थानकासमोरील अत्यंत गजबजलेल्या मार्केट परिसरात घडली होती, जिथे एका मद्यधुंद बेस्ट चालकाने थेट प्रवाशांच्या अंगावर बस घालून ३० ते ४० वाहनांना उडवले होते. ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता आणि ४२ हून अधिक लोक जखमी झाले होते. आकडेवारीवर नजर टाकली तर थरकाप उडवणार वास्तव समोर येतय की, गेल्या तीन वर्षांत बेस्ट बसचे एकूण ९५८ अपघात झाले असून ७७ पेक्षा निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
८८ टक्के मृत्यू हे खाजगी कंत्राटदारांच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे झाले
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, मागील वर्षात बेस्टच्या अपघातात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ८८ टक्के मृत्यू हे खाजगी कंत्राटदारांच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे झाले आहेत. त्यामुळे मुंबईची बेस्ट वरदायणी ठरण्यापेक्षा जीवघेणी जास्त ठरत आहेत. पुढील काळीत तरी प्रशासन यावर गंभीर विचार करून काही मार्ग काढतंय का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.












