Maharashtra Heavy Rain Update: राज्यातील वाढत्या पावसामुळे हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांसाठी रेड अलर्ट तर मुंबईसह अनेक भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. (Maharashtra Heavy Rain Update) नाशिक जिल्ह्यातील काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईसह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: उद्या कठं ढग फुटणार? मुख्यमंत्री असं का म्हणाले..? जाणून घ्या
नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट
त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसराला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मेटघर गावासह विविध भागांची पाहणी केली.
जोरदार पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन २७ कुटूंबातील १०० हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
पालघर आणि वसई- विरारमध्येही सतर्कता
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. काही भागांमध्ये 350 ते 400 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. एका धरणाच्या पिचिंगमध्ये किरकोळ हालचाल झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. Maharashtra Heavy Rain Update
नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून वाढवला पाण्याचा विसर्ग
नाशिक आणि इगतपुरी परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री 1 वाजल्यापासून विसर्ग 1,614 क्युसेकवरून 3,228 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Heavy Rain Update
मुंबईत ऑरेंज अलर्ट कायम
मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आजसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. दिवसभर जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मिठी नदीची पाणीपातळी वाढल्याने संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. Maharashtra Heavy Rain Update
मुंबई लोकल सेवा पूर्ववत
मुसळधार पावसामुळे काही काळ विस्कळीत झालेली वसई रोड–विरार दरम्यानची मुंबई उपनगरी रेल्वे सेवा आता पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा.











