Amit Shah And Devendra Fadnavis Delhi Meeting: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीनंतर झालेल्या या चर्चेकडे राज्यातील आगामी राजकीय निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Amit Shah And Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आगामी रणनीती तसेच भाजपच्या संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीतील अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दिल्लीतील बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Amit Shah And Devendra Fadnavis ) यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील सत्तेचे समीकरण, केंद्रातील राजकीय घडामोडी आणि भाजपच्या भविष्यातील नियोजनावर विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदल आणि भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना मिळू शकणाऱ्या संधींबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळात तातडीने बदल नाही?
अमित शाह आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्य मंत्रिमंडळात तातडीने मोठे फेरबदल होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही स्वतंत्र भेट घेतल्याची माहिती आहे.
नर्मदा प्रकल्पावर चार राज्यांची महत्त्वाची बैठक (Narmada Project)
दिल्लीत अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव तसेच संबंधित राज्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नर्मदा नदीच्या पाणीवाटपाशी संबंधित विषय, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि जमिनीच्या मोबदल्यासारख्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या मुद्द्यांवर काही महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार गटाच्या महायुती प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी काही दिवसांपासून जोर धरला होता. भाजप नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्यता फेटाळून लावल्या. महाराष्ट्रातून एनडीएमध्ये कोणताही नवीन पक्ष सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच शरद पवार यांच्या पक्षातील नेते किंवा लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
दिल्ली भेटीनंतर राजकीय हालचालींकडे लक्ष
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Amit Shah And Devendra Fadnavis) यांच्यातील भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार, भाजपची संघटनात्मक रणनीती आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.










