Manipur Violence 2026 : मणिपूरची परिस्थिती हाताळण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सपशेल फेल ठरलेत का? असा सवाल उपस्थित झालाय, कारण गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार पुन्हा एकदा भडकलाय. पुन्हा मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यात झालेल्या भीषण गोळीबारात एका जखमी नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर या ताज्या हिंसक घटनेतील एकूण मृतांची संख्या आता तीन झाली आहे. २४ आणि २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान उफाळलेल्या या नव्या हिंसक सत्रामुळे संपूर्ण ईशान्य भारतात पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. नेमकं काय घडतंय मणिपूरमध्ये पाहूयात…
मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं? ( Manipur Firing )
मणिपूर राज्यातील सेनापती जिल्ह्यातील कलेनजांग गावात सशस्त्र अतिरेक्यांनी एका घरावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये रॉकी माओ आणि कुमार पौमाई या दोन निष्पाप नागा नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. या गोळीबारात अन्य दोन नागरिक गंभीर जखमी झाले होते, ज्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २७ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास ४९ वर्षीय आशिहो सानी या जखमी व्यक्तीने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे या घटनेतील बळींची संख्या तीनवर पोहोचली. या भीषण हत्येनंतर स्थानिक नागा संघटना आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसरात लष्कर आणि स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, नागरिक आपल्या घरात झोपलेले असताना अतिरेक्यांनी आत घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडणे ही अत्यंत भ्याड घटना आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मणिपूरमध्ये विविध हिंसक चकमकींमध्ये ६० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे, युनायटेड नागा कौन्सिलने महामार्गांवरील आपला चार महिन्यांचा आर्थिक वेढा मागे घेण्याची घोषणा करण्याच्या अवघ्या एक तास आधीच हा हल्ला घडवून आणण्यात आला, ज्यामुळे यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचाराची पार्श्वभूमी काय? ( Manipur Violence 2026 )
मणिपूरमधील हा हिंसाचार केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण पर्वतीय भागात पसरत चालला आहे. या घटनेच्या अवघ्या ४८ तास आधी, २४ सप्टेंबर रोजी शेजारील कामजोंग जिल्ह्यातील पिलॉन्ग गावात म्यानमार सीमेवरून आलेल्या संशयित कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात चार नागा नागरिकांची हत्या केली होती. सप्टेंबर महिन्यातच तामेंगलाँग, कांगपोकपी आणि नोनी जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या सशस्त्र हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या वांशिक संघर्षामुळे राज्यातील कुकी, मेईतेई आणि आता नागा समुदायांमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे.
मणिपूरमध्ये मे २०२३ पासून सुरू झालेला वांशिक हिंसाचार हा प्रामुख्याने बहुसंख्याक मेईतेई आणि पर्वतीय भागात राहणाऱ्या कुकी समुदायादरम्यान पेटला होता. या संघर्षाची मुख्य ठिणगी मेईतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या उच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर पडली, ज्याला कुकी आणि इतर आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध केला. ३ मे २०२३ रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूरने काढलेल्या ‘आदिवासी एकता मोर्चा’दरम्यान पहिल्यांदा हिंसाचार उफाळला. त्यानंतर इम्फाळ खोऱ्यातील आणि आजूबाजूच्या डोंगराळ जिल्ह्यातील अनेक गावांना लक्ष्य करण्यात आले. या सुरुवातीच्या हिंसाचारात हजारो घरे, चर्च आणि धार्मिक स्थळे जाळण्यात आली, ज्यामध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि सुमारे ६० हजारांपेक्षा जास्त लोकांना विस्थापित होऊन मदत छावण्यांचा आसरा घ्यावा लागला.
मणिपूरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होणार? ( Manipur Firing )
हा हिंसाचार केवळ सुरुवातीच्या काही महिन्यांपुरता मर्यादित न राहता पुढील तीन वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरूच राहिला. संपूर्ण राज्याचे भौगोलिक आणि सामाजिक आधारावर खोरे आणि डोंगर अशा दोन भागात स्पष्ट विभाजन झाले. दोन्ही बाजूंनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर, ड्रोन हल्ले, I.E.D स्फोट आणि बफर झोनमध्ये झालेल्या गनिमी काव्याच्या हल्ल्यांमुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय लष्कराने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हजारो अतिरिक्त जवान तैनात केले आणि शांतता समित्या स्थापन केल्या, तरीही सीमावर्ती भागातून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दोन्ही समुदायांमधील वाढलेल्या अविश्वासामुळे राज्यात वारंवार हिंसक चकमकी घडत राहिल्या आहेत, ज्याची झळ आता नागा समुदायालाही बसू लागली आहे. त्यामुळे मणिपूर शांत कधी होणार? याचं उत्तर सध्या संपूर्ण देश गृहमंत्र्यांकडे मागतोय, गृहमंत्री अमित शाह मात्र गप्पच आहेत…
ब्युरोरिपोर्ट एलएस मराठी..



