Ford Motors India investment 2025 : अमेरिकेतील सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोर्ड मोटर्स पुन्हा एकदा भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. तब्बल 3250 कोटी रुपयांचा भक्कम निधी कंपनी भारतात गुंतवणार असून, याअंतर्गत नवीन इंजिन तयार करण्यासाठी आधुनिक कारखाना उभारला जाणार आहे. ही गुंतवणूक तमिळनाडूमधील मराइमलाई नगर येथील विद्यमान प्लांटमध्ये होणार आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, या निर्णयाची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “मेक इन अमेरिका” या घोषणेखाली देशातील कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन वाढवण्याचा दबाव आणला होता. तरीदेखील फोर्डनं तो दबाव झुगारत भारतातील उत्पादनावर विश्वास दाखवला, हे विशेष लक्षवेधी ठरलं आहे.
हे हि वाचा : नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून सिलिंडरच्या किमतींपासून ते जीएसटी नोंदणी प्रक्रियेपर्यंत, या गोष्टी बदलल्या आहेत
फोर्डचा भारताशी संबंध काही नवीन नाही. कंपनीनं 1995 साली चेन्नईजवळ आपला पहिला प्लांट सुरु केला होता, तर 2015 मध्ये गुजरातच्या साणंद इथं दुसरा कारखाना उभारला. मात्र 2020 मध्ये सीईओ जिम फर्ले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रासोबतचा करार रद्द केला आणि एका वर्षात भारतीय बाजारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साणंदचा प्लांट टाटा मोटर्सला विकण्यात आला, आणि आता तिथं टाटाकडून इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन सुरु आहे.
त्या काळात फोर्डनं नफा न देणाऱ्या बाजारपेठांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात भारत आणि ब्राझील या देशांचा समावेश होता. परंतु आता पुन्हा एकदा फोर्डनं भारतीय बाजाराकडे पाहण्यास सुरुवात केली आहे, हे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी मोठं संकेत मानलं जातं. ट्रम्प प्रशासनाकडून भारतावर तब्बल 50 टक्के आयातशुल्क लादण्यात आलं असतानाही फोर्डनं भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याने, कंपनीनं आर्थिक राष्ट्रीयतेपेक्षा जागतिक विस्ताराला प्राधान्य दिलं, असं स्पष्ट दिसतं.
फोर्डचा तमिळनाडूतील नव्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 2 लाख इंजिनं तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. ही इंजिनं प्रामुख्यानं निर्यातीसाठी वापरली जाणार असून, भारतातील तंत्रज्ञान, मजूरशक्ती आणि उत्पादन खर्चाचा फायदा घेण्याची रणनीती कंपनीनं आखली आहे. अधिकृत निवेदन अद्याप आलेलं नसले तरी, या गुंतवणुकीमुळं फोर्ड पुन्हा भारताच्या ऑटोमोबाइल नकाशावर जोरदार पुनरागमन करणार, हे निश्चित आहे. (Ford Motors India investment 2025)










