Chembur School Bus Accident: मुंबईतील चेंबूर परिसरात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने १३ विद्यार्थीमधील १० मुलं जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
मुंबईच्या चेंबूर परिसरातील 11 नंबर रोडवर शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातात सुमारे 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा: एकनाथ शिंदेंची जिभ घसरली! सभागृहात बोलताना म्हणाले, आमदार सचिन…
स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसवर पडलेले झाड हटवून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातानंतर काही विद्यार्थी बसमध्ये अडकले होते. बचाव पथकांनी त्यांना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
या घटनेमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेनंतर काही काळ परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. झाड हटविण्याचे काम सुरू असून, प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, ही बस कोणत्या शाळेची होती, बसमध्ये एकूण किती विद्यार्थी होते आणि झाड कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही. पोलिस आणि संबंधित यंत्रणा या घटनेचा पुढील तपास करत आहेत.










