छत्रपती संभाजीनगर : बॅनरसमोर बॅनर लावल्यानं दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन एका 17 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील बिडकीन (ता. पैठण) इथं बसस्थानक परिसरात गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री 10 च्या सुमारास घडली. तन्मय गणेश चोरमारे (रा. धनगर गल्ली, बिडकीन) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे.
नेमकं काय झालं :
बिडकीन पोलीस ठाण्यात योगेश मारुती दाणे यांनी तक्रार दिली. त्यांचा भाचा ऋत्विक धर्मे यानं बसस्थानक परिसरात दीपावली शुभेच्छांचे बॅनर लावलं होतं. त्याच्या बॅनरसमोरच ऋषिकेश उर्फ चिमण जाधव याचा वाढदिवस असल्यानं त्यानंही स्वतःला इतरांकडून शुभेच्छा देणारे बॅनर लावले. यातून ऋत्विक व ऋषिकेश यांचा कॉलवर वाद झाला. या वादातून ऋषिकेशनं राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे, संतोष ठाणगे आणि इतर 30 ते 35 जणांसोबत मिळून गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास ऋत्विकवर प्राणघातक हल्ला चढवला. या वेळी ऋत्विकसोबत त्याचा तन्मय चोरमारे व त्यांचे मित्र होते.
हे हि वाचा : पिंपरी चिंचवड शहरात भावी नगरसेवक पत्नीने काढला पतीचा काटा; चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणाला कंटाळून आवळला गळा
दोन्ही गटात जोरदार हाणामारी :
यानंतर दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी सुरू झाली. लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर तुटून पडले. यात तन्मयच्या डोक्याला गंभीर मार लागून तो गंभीर जखमी झाला. तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. त्यानंतर ऋषिकेश व त्याचे साथीदार पसार झाले. तन्मयला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं असता शुक्रवारी (24 ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दोन्ही गटांतील लोक हाणामारीत जखमी झाले. तन्मयच्या मृत्यूची बातमी गावात धडकताच त्याच्या नातेवाइकांनी संतप्त होऊन बिडकीन बाजारपेठ बंद केली. गावात तणाव निर्माण झाला. त्यामुळं बिडकीन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे












